अबबऽऽ एक तरूण करतोय १९ व्यवसाय - भगतवाडीच्या साधूआप्पा तानवडेचा विक्रम.. - Saptahik Sandesh

अबबऽऽ एक तरूण करतोय १९ व्यवसाय – भगतवाडीच्या साधूआप्पा तानवडेचा विक्रम..

अलिकडच्या कालावधीत एक माणूस स्वत:चा एक व्यवसाय नीट चालवू शकत नाही. पण जिद्द, चिकाटी आणि परिवाराचे पाठबळ असेलतर एक माणूस १९ – १९ व्यवसाय करू शकतो; याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे भगतवाडी (ता.करमाळा) येथील साधूआप्पा अशोक तानवडे यांचे उदाहरण आहे..!

अशोक बाबू तानवडे व सौ. यमुनाबाई अशोक तानवडे यांना सोमनाथ व साधू ही दोन मुले तर सीना नावाची एक मुलगी असा परिवार असताना सोमनाथ याचे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे साधू तानवडे यांना अकरावी झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. घरी तीन एकर जमीन परंतू जिरायत असल्याने कोणतेही उत्पन्न नव्हते. त्यामुळे त्यांना टाकळी येथे शेतकऱ्याच्या शेतात कामाला जावे लागत होते.

विशेष म्हणजे भगतवाडी ते टाकळी सायकलवर जाऊन हे काम करत असत. दरम्यान सन १९९८ ला त्यांनी आपण स्वत: काहीतर केले पाहिजे म्हणून घरात मोटारसायकल, सायकल पंक्चर काढायचे दुकान साधा पंप घेऊन सुरू केले. त्यानंतर त्यांनी पंक्चर काढण्याची मोठी मशीन घेतली व घरासमोर चटया टाकून दुकान सुरू केले. त्यानंतर याच ठिकाणी चटया काढून पत्रे टाकले व २००४ ला हार्डवेअर टाकले. पुढे ही जागा अपुरी पडल्याने साधूआप्पा यांनी दुसरी जागा घेतली व जवळपास सात लाख रूपये खर्च करून मोठे दुकान उभे केले.

त्यानंतर मात्र त्यांनी मागे पाहिले नाही. याच जागेत किराणा दुकान, वेल्डींगचे दुकान, कोल्ड्रींक्स, सिमेंट विक्री, इंडेन गॅस विक्री, रासायनिक खते, पशुखाद्य विक्री व्यवसाय सुरू केला. लग्नसमारंभास भांडी, चटई भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. या जोडीला ड्रीप विक्री करणे-जोडणे हे व्यवसाय सुरू केले. तर पत्नीच्या आग्रहाखातर लेडीज शॉपीही सुरू केली. ग्रामस्थांच्या गरजेसाठी व स्वत:साठी पीकअप आणि स्कार्पिओ ही वाहने घेतली व ज्यांना गरज लागेल त्यांना योग्य भाड्याने ती दिली जातात. जोडीला शेतीत ऊस केला असून शेजाऱ्याची दीड एकर वाट्याने करून त्यातही ऊस केला आहे. तर जोडीला पत्नीच्या सांगण्यावरून १५ शेळ्यांचे शेळीपालन केले आहे. विशेष म्हणजे या सर्व व्यवसायासाठी परिवारातील सर्वजण जीव तोडून काम करतात. वडील अशोक तानवडे, आई यमुना तानवडे आणि पत्नी रेखा तानवडे या सर्वांचे पाठबळ चांगल्याप्रकारे मिळत असल्याने ही त्यांची झेप यशस्वी झाली आहे.

लहानपणापासून काही ना काही आपण केले पाहिजे.. असे एक स्वप्नं समोर ठेवून मी व्यवसायात उतरलो. एकातून एक व्यवसाय वाढत गेला आणि ग्राहकाच्या माध्यमातून माणसांचा संपर्क वाढला. यातूनच मी गावातील आडेल नडेल अशा माणसाच्या सेवेला कायम धावून जातो. कोरोना कालावधीत अनेक रुग्णांना मी स्वत:चा विचार न करता वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. मी कष्ट व जिद्दीच्या जोरावर माझ्या घराची प्रगती केली आहे. याचप्रकारे यापुढे गावच्या विकासाच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. माझा परिवार हा पूर्ण निर्व्यसनी असून आम्ही सांप्रदायिक विचाराने वाटचाल करत आहोत. माझी मुले सुमित व संकेत हे नववी व सातवीला असून जालना येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. मृदुंग वाजवणे, गायन व किर्तन असे शिक्षण सुरू आहे. संकेत हा जाहीर किर्तनात उतरेल; अशी अपेक्षा आहे.ज्याला प्रगती करायची आहे, त्याने प्रयत्नशील राहिल्यानंतर निश्चित यश मिळू शकते; हा माझा अनुभव आहे.

…साधू (आप्पा) तानवडे, भगतवाडी (मो. ७५१७०९६३६३ )

साधूआप्पा तानवडे करत असलेले व्यवसाय..

मोटारसायकल ते चारचाकीचे पंक्चर काढणे, हार्डवेअर, संगणकावरून सातबारा उतारे व इतर कागदपत्र काढून देणे, मोबाईल रिचार्ज, किराणा दुकान, वेल्डींग (फॅब्रीकेशन), सिमेंट विक्री, इंडेन गॅस विक्री, गरजेनुसार शेतकऱ्यांना खताची विक्री, पशुखाद्य विक्री, लग्न समारंभासाठी भांडी व तत्सम वस्तू भाड्याने देणे, पिकअप भाड्याने देणे, स्कार्पिओ भाड्याने देणे, ड्रीप विक्री करणे, कोल्ड्रींक्स विक्री, सह्याद्री ॲग्रो दूध संघाचे दूध संकलन, लेडीज शॉपी, शेळीपालन, ऊस शेती

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!