३० वर्षानंतरही केम औद्योगिक वसाहतीसमोर अनेक समस्या - शासनाच्या सहकार्याची गरज.. - Saptahik Sandesh

३० वर्षानंतरही केम औद्योगिक वसाहतीसमोर अनेक समस्या – शासनाच्या सहकार्याची गरज..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : गेल्या ३० वर्षापूर्वी केम येथे उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली आहे. आजपर्यंत अनेक प्रयत्न करूनही या वसाहतीसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. अद्याप शासनाकडून बिगरशेती परवाना मिळालेला नाही. २४ तास वीजेची सुविधा, २४ तास पाणी व रेल्वेक्रॉसिंग अशा महत्वाच्या समस्या रेंगाळलेल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार ते जिल्हाधिकारी या शासनाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याची मोठी गरज आहे.

केम येथील कुंकू व्यावसायिकांना व इतर उद्योजकांना स्वत:चे व्यवसाय उभे करण्यासाठी १९९३ मध्ये विठ्ठल भिस्ते, कै. सोलापूरे, अरविंद येवले तसेच जगन्नाथ वैद्य आदींनी जोरदार प्रयत्न करून उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. यानंतर सुधाकर येवले यांच्या मार्गदर्शनातून या संस्थेची सहाय्यक निबंधक यांच्याकडे नोंदणीही करण्यात आली. सन १९९७ ला शासनाने वतनाची जमीन संपादीत करून संस्थेला खरेदीने दिली. त्यानंतर २००४ पर्यंत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा भुमी अभिलेख (एडीटीपी) यांनी मान्यता दिली.

त्यानंतर टाऊन प्लॅनिंग व भुसंपादन विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला. पूर्वी केमकरमाळा रस्त्यासाठी संपादीत झालेल्या ६२ आर क्षेत्र हे भुमी अभिलेख कार्यालयाकडून संस्थेच्या क्षेत्रातून कमी करण्याबाबत आदेश दिला होता. ही बाब संस्थेला भुमी अभिलेख कार्यालयास पटवून देण्यासाठी व कागदोपत्री ६२ आर क्षेत्र वाढवून मिळण्यासाठी सन २०११ पर्यंत शासकीय दरबारी प्रयत्न करावे लागले. त्यानंतर इतर सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना सन२०१७ मध्ये सहाय्यक निबंधकांनी चक्क औद्योगिक वसाहत संस्था बंद का करू नये.. अशी नोटीस दिली होती. त्यानंतर संस्थेचे चेअरमन मनोज सोलापूरे व सचिव उत्तरेश्रव नरखेडकर यांनी सर्व स्थिती सहाय्यक निबंधकाला समजावून सांगितल्यानंतर संस्थेचे कामकाज नियमित केले आहे. आत्तापर्यंत संस्थेने मिळालेल्या जागेत ५३ प्लॉट पाडले असून विजयादशमीला सहा उद्योजकाला प्लॉटचे वाटप केले आहे. संस्थेचे एकूण ७९ सभासद आहेत.

मनोज सोलापूरे – चेअरमन, उत्तरेश्वर नरखेडकर – सचिव, जगन्नाथ वैद्य – उपाध्यक्ष, मोहन कांबळे, सुदर्शन भिस्ते, नितीन दोशी, नागेश शेटे, रमेश येवले, अलका सोलापूरे, इंदूमती देवकर आदी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

केम येथील औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी २४ तास वीज मिळणारी विज वितरण कंपनीचे फिडर आवश्यक आहे. तसेच २४ तास पाण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आवश्यक आहे. याशिवाय काही बाबतीत रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न येतो तर अंतर्गत रस्ते करणे आवश्यक आहे. संस्था पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी तहसीलदारांकडून बिगरशेती आदेश हा मिळणे गरजेचे आहे. उर्वरित प्लॉट आम्ही लवकरच उद्योजकाला देणार असून उद्योजक औद्योगिक वसाहतीत आपले व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याकामी शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्याची आवश्यकता आहे.

….मनोज सोलापूरे (चेअरमन)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!