आदर्श गुरूपरंपरेतील अखेरचा दीप निमाला!.. - Saptahik Sandesh

आदर्श गुरूपरंपरेतील अखेरचा दीप निमाला!..

स्व.बाबुराव रासकर

रासकर गेले…माझ्या आदर्श गुरूपरंपरेतील गेल्या पिढीतील अखेरचा मिणमीणता दीप निमाला. सरांच्या जाण्यानं मन सुन्न झालंय, जगण्यातली पोकळी, पोरकेपण आणखीन वाढल्याची भावना अस्वस्थ करतेय.खरे तर परवा गुरुपौर्णिमेनिमित्त सरांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो, त्यावेळी सरांनी त्याही अवस्थेत मला ओळखलं आणि “मी याला घडवलंय !” असं म्हंटलं त्यावेळी टचकन डोळ्यात पाणी उभं राहिलेलं आणि सरांची अवस्था बघून पुढच्या गुरुपौर्णिमेला सरांचा आशीर्वाद मिळेल का ही मनात आलेली दुष्ट शंका दुर्दैवाने तिसऱ्याच दिवशी खरी ठरली.

गेल्या अनेक वर्षांपासून मी ज्यांच्या हाताखाली शिकलो, ज्यांनी मला संस्कारक्षम केलं त्या मला आजन्म आदरणीय असलेल्या गुरूजनांना गुरुपौर्णिमेला भेटून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेणं हे मला अतीव समाधान व मानसिक उर्जा देणारं असं असायचं.

कालपरत्वे आणि वयोमानानुसार माझ्या आदर्श गुरूपरंपरेतील ना.बा.परदेशी, नागनाथ निलाखे, सुमेरसिंग परदेशी, प्राचार्य वि.भ.तथा प्रभाकर बिडवे,जेऊरचे मु.ना.कदम सर,चंद्रकांत दास गुरूजी,रा.ए.माने गुरूजी असे एक-एक दीप मालवत गेले आणि आता रासकर सरांच्या जाण्यानं गुरूजनां विषयीचं माझं भावविश्व पूर्णतः रितं झालंय…हे रितेपण, पोरकेपणाची भावना मनाला विषण्णपणे व्यापून उरलीय!

माझ्या शाळा,विद्यालयातल्या कालखंडापर्यंत मला आणि माझ्याचं पिढीतल्या पण माझ्याहून ज्येष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना लाभलेली अशी गुरूपरंपरा ज्या-ज्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली ते माझ्यासह सगळेच विद्यार्थी,ती संपूर्ण पिढीच नशीबवान,भाग्यवान ठरली असं मला वाटतं !

त्या काळातली प्रचलित व सर्वमान्य असलेली ” छडी लागे छमछम,विद्या येई घमघम ! ” ही म्हण किती वास्तववादी आणि योग्य होती हे आजच्या गल्लाभरू व पाट्या-टाकू शिक्षणपद्धतीकडे पाहिल्यावर लक्षात येते.बाबूराव बन्सी रासकर सर हे मात्र त्याकाळात देखील छडीच्या नियमाला अपवाद होते.सर आमच्या वर्गातला आठवी ते दहावीपर्यंत मराठी शिकवायला होते.मराठी व इतिहास हे माझे आवडते विषय आणि सरांचं मराठी शिकवणं,त्यांची मृदू-रसाळ भाषाशैली,उदाहरणांसह हसतखेळत शिकवण्याची हातोटी,लक्ष न देणार्‍या विद्यार्थ्यांना शाब्दिक जोडे मारून वठणीवर आणण्याची शैली आणि त्यांच्या तोंडी विद्यार्थ्यांना उद्देशून असलेलं नेहमीचं पंढरीच्या दिंडीचे उदाहरण या सार्‍या आठवणी आजदेखील माझ्यासह शेकडो विद्यार्थ्यांना नक्कीच आहे!

हस्ताक्षर चांगले असल्यामुळे असेल कदाचित पण सुरूवातीपासूनच सरांचं माझ्यावर जरा अधिक लक्ष असायचं.माझी वही,हस्ताक्षर वर्गातील माझ्या सहाध्यायींना दाखवून सर नेहमी म्हणायचे…ज्याचं अक्षर सुंदर त्याचं मन सुंदर! खरे तर मला त्यावेळी पत्रकार या शब्दाचा अर्थ देखील समजत नव्हता (आमचे दादा पत्रकार आहेत हे माहीत होतं पण पत्रकार म्हणजे नक्की काय? हे कळण्याचं माझं वय नव्हतं,कारण इंटरनेट,टीव्ही,काॅम्प्युटरसारख्या माध्यमांमुळे आजच्या पिढीला अकाली नको इतकी आलेली प्रगल्भता निदान आमच्यापर्यंतच्या पिढीला तरी आलेली नव्हती) पण सर शिकवताना नेहमी म्हणायचे,येवले तुला पत्रकार व्हायचंय..तुझे वडील हे नामांकित पत्रकार आहेत.त्यावेळी सरांचं हे बोलणं बरंचसं डोक्यावरून जायचं पण माझं आजचं व्याकरण आणि शुध्दलेखनाचं थोडेबहुत ज्ञान ही पूर्णतः सरांची अमूल्य अशी शिकवण आहे हे निश्चित!

मी उल्लेखलेल्या गुरूजनां पैकी दास गुरूजी, मु.ना.कदम, प्राचार्य बिडवे यांच्या हाताखाली शिकलो नसलो तरी कळायला लागल्यापासून यांच्याविषयीचा आदर आणि धाक मनात रुजलेला! यातील बहुसंख्य गुरूजन हे आमच्या दादांचे स्नेही असल्याने तो एक प्रकारचा धाक म्हणण्यापेक्षा पित्रृतुल्य आदर म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.मी पाचवीला गांधी विद्यालयात येण्यापूर्वीच निवृत्त झालेले,विद्यार्थी म्हणून नाही पण माझ्या आधीच्या ज्येष्ठांना शिकवलेले, मी ऐकलेले व पाहिलेले डी.एन.के.,कमलाकर घोडके,दिवाण सर अशा आदर्श,समर्पित शिक्षकांची आठवण आजही मनामध्ये ताजी आहे.यापैकी घोडके,दिवाण असे इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व असलेले व शिकवण्याचा हातखंडा असलेले शिक्षक निवृत्तीनंतर शिकविण्यांच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे काम करत असलेले मी पाहिलेले आहे.किल्ल्यात भाड्याच्या घरात अगदी निवृत्तीनंतर देखील आयुष्य घालवलेल्या घोडके सरांकडे तर मी पाचवी ते सातवीपर्यंत शिकवणी लावल्यामुळेच माझा इंग्रजी विषय बर्‍यापैकी सुधारलेला.

पुढे आठवी ते दहावीपर्यंत निलाखे सरांच्या शिकवण्यामुळे माझं इंग्रजी अजून थोडंफार सुधारलं.सुमेर सर हे गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक पण आमच्या वर्गाला मात्र भौतिकशास्त्र शिकवायला होते पण मी दहावीत गणिताची शिकवणी सरांकडे लावली म्हणूनच पास होऊ शकलो ही भावना आजही माझ्या मनामध्ये निरंतर आहे. आणि मी व माझ्या आधीची पिढी नशीबवान यासाठी समजतो की त्या काळातले शिक्षक हे विद्यार्जन हा धंदा नव्हे तर ध्येयवाद,समर्पण या भावनेतून विद्यार्थी घडवणे या उदात्त हेतूने भारलेले आणि अवघाची संसार सुखाचा करीन! या विचाराने भारलेले,विद्यार्थी हाच प्रपंच मानणारे असल्याने लौकिक अर्थाने आपला फाटका प्रपंच मिनतवारीने ओढत असताना नवी पिढी घडविण्यात कृतार्थता मानणारे होते.

माझ्या आधीच्या पिढीला,आमच्या दादांना शिकवलेल्या गुरूजनांना देखील मी पाहिलेले व त्यांच्याविषयी दादांना असलेला आदर देखील मी अनुभवलेला आहे.त्यापैकी शि.ग.शेंडे,माधव मास्तर कुलकर्णी(केमकर),जोशी गुरूजी,बळवंत ओंबासे गुरूजी हे गुरूजन माझ्या अजून स्मरणात आहेत.प्राचार्य मु.ना.कदम सरांना माझ्या लिखाणाचं कौतुक असायचं,प्रसंगान्वये मी लिहिलेलं काही वाचनात आलं की फोन करून अथवा पत्र पाठवून माझ्या पाठीवर शाब्बासकीची थाप,आशीर्वाद आवर्जून द्यायचे.

गांधी विद्यालयातील पी.बी.गायकवाड,जांभळे, लोकरे, कुंभार,चित्रकलेचे विधाते आदी शिक्षकांचे समरसून शिकवणं,शाळा व विद्यार्थ्यांविषयीचं असलेलं तादात्म्य आजही स्मरणात आहे.विधाते सरांचा असलेला धाक आणि भरभरून खाल्लेला मार अजूनही आठवतोय मध्यंतरी एकदा सरांची रस्त्यात भेट झाल्यावर गप्पा मारताना मी त्यांचा कसा,किती व कशामुळे मार खाल्ला,खायचो या आठवणींना आदरपूर्वक व हसत-हसत उजाळा दिला होता.या सगळ्याच गुरूजनां विषयी मनात असलेल्या आठवणी,आदर ही माझ्या आयुष्यातली महत्वाची शिदोरी आहे.

रासकर सर आणि माझ्या आदरणीय गुरूजनां पैकी बहुतेक जण आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांनी मला,आम्हाला दिलेली शिकवण,संस्कार आणि त्यांच्या आठवणी हेच आता आमच्या उर्वरित आयुष्याचे अमर्त्य असे संचित आहे.या गुरूजनांचे असलेले ऋण मन-ह्दयात आजन्म बाळगणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल!

रासकर सर…तुम्हा सार्‍यांसारखे गुरू या जन्मी पुन्हा लाभणे नाही या असह्य वेदनेला उरात दडपून ठेवून तुम्हाला विनम्र श्रद्धांजली…तुमच्या अमर स्मृतींना भावपूर्ण अभिवादन!

तुमचा सदैव आज्ञाधारक विद्यार्थी,
विवेक शं.येवले, करमाळा
(मो.९४२३५२८८३४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!