योग्य मार्गदर्शन असेल तर निश्चित प्रगती होते – गणेश करे-पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : “गुरूच्या सहवासाने आपली प्रतिमा फुलते, आपल्यातले सुप्त गुण ऍक्टिव्हेट करण्याचे काम गुरु करत असतात, योग्य मार्गदर्शन असेल तर निश्चित प्रगती होते, त्यामुळे गुरुचे मार्गदर्शन मोलाचे ठरते” असे मत यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.
करमाळ्यातील गिरधररदास देवी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे गणेश करे -पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एस.एस.सी. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी कुमार प्रतीक लक्ष्मण टेकाळे प्रथम, कुमारी तनवी रवींद्र आडसुळ द्वितीय, कुमार शुभम संजय गाडे तृतीया तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये कुमारी. दीप्ती सुभाष शिंदे या गुणवंतांचा सत्कार गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्यावतीने रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन तर कल्याणी सेवाभावी ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गणेश करे- पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम अनुक्रमे 3000, 2000, 1000 सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुमारी सायली दत्तात्रय साळुंके व शुभम सुंदरदास चव्हाण या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सचिव अमोद संचेती, सुनीता देवी, चंद्रकांत देवी, अनुज कन्हैयालाल देवी, विजयकुमार रमणलाल दोशी, श्री दशरथ टेकाळे ,श्री रविंद्र अडसूळ हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयवंत नरतवडेकर यांनी केले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी जगताप यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.