डॉ.आंबेडकर आणि हिंदू कोड बिलातील स्रीयांचे हक्क व अधिकार - Saptahik Sandesh

डॉ.आंबेडकर आणि हिंदू कोड बिलातील स्रीयांचे हक्क व अधिकार

असे म्हणतात कि प्रत्येक यशश्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतातील महात्मा फुलेंनंतर  स्वतंत्र भारतातील स्त्रियांच्या प्रगतीमागे जो जग बदलणारा बाप माणूस आहे तो म्हणजे महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर.

भारतातील समस्त स्त्री वर्गानं, काय केलं बाबासाहेबांनी  आमच्यासाठी? असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा काही प्रश्नांची उत्तरे शोधावीत असं मला वाटत. यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मुनुस्मृती मधून भेटतील.  सोबत आपल्या काही अधिकारांचा आणि हक्कांचा उलगडा होईल. त्यासोबतच  गुलामी खाली आयुष्य जगणं काय असते याची जाणीव देखील होईल. आज स्वतंत्र भारतात कित्येक अधिकार महिलांना बाबासाहेबांमुळे मिळाले आहेत. या अधिकारांना आपण गृहीत धरतो व हे सर्व ज्यांच्या प्रयत्नामुळे मिळाले आहेत त्यांना मात्र आपण लेबल लावतो. या अधिकारामुळे महिलांना हक्क,प्रतिष्ठा, दर्जा प्राप्त झाला. कारण समाजात स्त्री -पुरुष दोन्ही घटक मह्त्वाचे आहेत. एक घटक विषम असेल तर तो समाज प्रगती कसा करू शकेल ?

हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या  प्रदीर्घ निबंधात बाबासाहेबांनी धार्मिक अंध:पतनावर  चर्चा केली आहे .
“न स्त्री स्वतंत्र्याम अर्हती” हे सांगितलेल्या व स्त्रियांबद्दल   अतिशय नीच पातळीवरील,अपमानास्पद  वर्णन करणारी मनुस्मृती जाहीरपणे जाळून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच केला. महाड येथे झालेल्या तीन दिवसीय परिषदेमध्ये बाबासाहेबांनी तिसऱ्या दिवशी स्त्रियांना उद्देशून भाषण केले. स्त्रियांनी आपले राहणीमान कसे सुधारावे, दारू पिऊन येणारा नवरा, भाऊ, बाप  ई. पुरुषान साठी दार उघडू नका असे  त्यांनी सांगितले ! केवढा हा मोठा सल्ला ! दारूने संसाराची कशी राख,रांगोळी होती हे त्यांनी जाणले होते.

स्वतंत्र, समता व बंधुता ही त्रिसूत्रे त्यांच्या चिकित्सेचा पाया  होती. यासाठी त्यांनी इतिहासचा अभ्यास केला  व स्त्री चे  स्थान काय होते हे तपासले. आज आपण राजकारण, खेळ, चित्रपट नोकरी, कलाक्षेत्र  ई . सर्व ठिकाणी महिला बघतो हा अधिकार त्यांना कलम १५,१६ ने दिलेला आहे. जातीअंतासाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा असे महाड सत्याग्रह परिषदेत त्यांनी जाहीर सांगितले . विधवा विवाह ,आंतरजातीय विवाह हे व्हायला हवेत व त्याची गरज त्यांनी स्पष्ट्पणे मंडळी. आज मुली शिकतात,नौकऱ्या करतात, अर्थार्जन करतात हे केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यामुळेच आणि म्हनून सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांनाच आपला उद्धार करता मानलेच पाहिजे.

भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरा पासून सुटका मिळावी यासाठी डॉ. आंबेडकरांनी इतिहास कालीन स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास,चिंतन,केले. बाबासाहेब एवढ्यावर थांबले नाहीत. या सगळ्याला एका कायद्यात बसवले तर ते ही अगदी सक्षमपणे. सर्व बारकावे तपासून, भविष्यातील वेध घेऊन “हिंदू कोड बिल “चा मसुदा लिहिला. कायद्याचे कवच असल्यावर स्त्रियांना हक्क मिळतीलच हा केवढा मोठा दृष्टीकोन.

५ फेब्रुवारी १९५१ ला डॉ. भीमराव आंबेडकर यांनी संसदेत हिंदू कोड बिल सादर केलं. या विधेयकाचा हेतूच हिंदू महिलांना सामाजिक शोषणापासून मुक्त करणं आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देणं होतं. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पडलेलं हे पहिलं पाऊल होतं. हे ऐतिहासिक पाऊल आज अनेक महिलांना ठाऊकही नसेल. त्यामुळे हे समजून घेणं आवश्यक आहे की या विधेयकात महिला सशक्तीकरणाची व्याख्या नेमकी काय सांगितली गेली? याआधी महिलांच्या धार्मिक अधिकारांबाबत मतमतांतरं होती. एकाच्या मते स्त्री ही धन, विद्या आणि शक्तीची देवता आहे. मनु संहिता हे सांगते की जिथे स्त्रीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवता वास्तव्य करतात.
तर ऋग्वेदात मुलीचा जन्म होणं ही दुःखदायी आणि मुलाचा जन्म आकाशासारखा मानला जातो आहे. ऋग्वेदात स्त्रीचं वर्णन हे मनोरंजनकारी आणि भोग्या रूपात आहे. नियोग प्रथा ही पवित्र मानली गेली आहे. अथर्ववेदात हे म्हटलं गेलं आहे की जगातल्या सर्व महिला शूद्र आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिल मंजूर कसं होईल या चिंतेत होते.
या कोड बिलामुळे स्त्रियांना वारसा हक्क, पोटगी, घटस्फोट घेण्याचे स्वतंत्र,विवाह अधिनियम,पुनर्विवाह अधिकार ई . महत्त्वपूर्ण गोष्टी मिळून स्त्रियांचा सर्व पातळीवर सामाजिक, वैवाहिक आर्थिक पातळीवर ईतका सखोलपणे विचार करून त्यांना सर्वस्तरामध्ये सक्षम स्वतंत्र करणे हे बाबासाहेबाचा दृष्टिकोन होता.

तत्कालीन सरकार मात्र हा महान,सर्व समावेषक  दृष्टीकोन समजून घेण्यास पात्र नसल्याने सदनात या विधेयकाला सदस्यांचं समर्थन मिळत नव्हतं. वास्तवात हिंदू कोड बिलच्या आधारे महिलांच्या हितांचं रक्षण करणारा कायदा आणणं ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. २६ सप्टेंबर १९५१ ला हे बिल मंजूर न झाल्याने बाबासाहेब खूप दुःखी झाले आणि २७ डिसेंबर १९५१ ला बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला.

आज ही ही मनोवृत्ती बदलेली आपणास दिसत नाही. याशिवाय सामान कामासाठी, सामान पगार असलाच पाहिजे (स्त्रीने – पुरुषांना), महिला स्वरक्षण कायदा,डिलिव्हरी सुट्ट्या पालकत्वाचा अधिकार , मालमतेचा अधिकार  मिळवूण  देणारे  आंबेडकर  “The one and only one ” आहेत.

सुलेखन – प्रशांत खोलासे, केडगाव (ता.करमाळा)

महिला सशक्तीकरणाचा मुद्दा पुढे करून बेटी बचाओ बेटी पढाओ, सेल्फी विथ डॉटर, सुकन्या समृद्धी योजना अशा काही योजनांची नावं आपल्याला माहित आहेतच. या योजनांचा आणि महिला सशक्तीकरणाच्या प्रयत्नांचा महिलांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो? याबाबत चर्चा झाली पाहिजे. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महिला सशक्तीकरणाचं खरं श्रेय जातं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना.  आपल्या मंत्रिपदाचा हेतूच पूर्ण झाला नाही तर ते पद सोडून द्यायचं हेच एका समाजसेवकाचं तत्त्व असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेच केलं.
बाबासाहेब आंबेडकर यांनी या बिलामुळे राजीनामा दिल्यानंतर हिंदू कोड बिलाच्या बाजूने अनेक प्रतिक्रिया देशभरातून आल्या. खासकरून महिला संघटनांनी या बिलाचं समर्थन केलं. एवढंच नाही तर विदेशातही यासंदर्भातल्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच १९५५-५६ मध्ये हिंदू कोड बिलाचे काही भाग संसदेने मान्य केले.
१) हिंदू लग्नासंबंधीचा कायदा

२) हिंदू घटस्फोटासाठीचा कायदा

३) हिंदू वारसा हक्काचा कायदा

४) हिंदू दत्तकगृहण कायदा.

या सगळ्याचं श्रेय अर्थातच जातं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच समाजात महिलांना समानतेच्या संधी उपलब्ध झाल्या. खरंतर आजही अनेक सामाजिक रूढी आणि परंपरा महिलांच्या विकासात अडथळे झाल्या आहेत. मात्र आज महिलांचं जे सशक्तीकरण झालं आहे आणि त्यांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे नाकारता येणार नाही.


✍️प्रा. राहुलकुमार चव्हाण, कोर्टी, ता.करमाळा, मो.9130205830

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!