केम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे विनापरवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरुद्ध व विक्रीचे ठिकाण असलेल्या जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

करमाळा पोलीस ठाण्याच्या केम पोलिस चौकीत कार्यरत असलेले पोलीस अंमलदार अमोल घुगे व सहाय्यकपोलीस फौजदार रणदिवे हे ड्युटीवर असताना, बजरंग दलाचे कार्यकर्ते मेघराज चव्हाण, अमोल बिचीतकर व अक्षय तळेकर यांनी त्यांना माहिती दिली की, केम गावातील अण्णा भाऊ साठे नगर येथील समाज मंदिरासमोर एका पत्र्याच्या खोलीत गोमांस विक्री होत आहे.

त्यानुसार आज (दि.१३) दुपारी २:३० च्या सुमारास पोलिसांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता, एक इसम घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी तपास केला असता, गोमांस, वजन मापण्याचे साहित्य व एक पांढऱ्या रंगाची इंडिका गाडी (MH 42K7522) आढळून आली. ही गाडी पळून गेलेल्या इसमाची असल्याचे समजले.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी करण्यात आली. त्यांनी मांस हे गोवंशीय असल्याचा संशय व्यक्त करत नमुने तपासणीसाठी दिले. एकूण १० किलो गोमांस, तराजू व अंदाजे ५०,००० रूपये किंमतीची इंडिका गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

या प्रकरणी पत्र्याच्या खोलीचा मालक नाथा हरीबा अवघडे याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२५ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(क), ६, ९ व ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.




