२९९ आणि ३९९ रू. च्या हप्त्यात दहा लाखांचे विमा कवच…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारतीय डाक विभागाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रति वर्ष २९९ किंवा ३९९ रू. च्या हप्तामध्ये विमाधारकास दहा लाख रूपयांपर्यंत विमा संरक्षण दिले आहे. टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटूंबासाठी ही योजना आणली आहे. ही योजना १८ ते ६५ वयातील व्यक्तींसाठी आहे. या योजनेचा फायदा करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन डाक विभाग तर्फे करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये व्यक्ती फक्त २९९ किंवा ३९९ रू.च्या हप्त्यामध्ये एका वर्षात १० लाख रूपयापर्यंतचा विमा मिळवू शकतात. यात विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रूपयापर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रूग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रूपयापर्यंतचा खर्च आणि रूग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रूपयापर्यंतचा दावा देखील करता येईल. त्याचबरोबर रूग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस तुम्हा प्रति दिन एक हजार रूपये देखील मिळतील. कुटूंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रूपयापर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रूपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रूपयापर्यंतची रक्कम मिळणार आहे.
या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा असून, एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विमा योजनेचे तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नूतनीकरण करावे लागेल. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेलतर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभ घेऊ शकता; असेही डाक विभागाने प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले आहे.
२९९ व ३९९ च्या पॉलिसीमधील फरक…
या दोन्ही योजना सारख्याच असून ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना एक लाखापर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते. त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्याजाण्यास कुटूंबियांना १० दिवसांपर्यंत प्रतिदिन १ हजार रूपये मिळतात. वाहतूक खर्च २५ हजार व मृत्यूनंतर ५ हजार अंत्यसंस्कार खर्च मिळेल. पण हे २९९ च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन १ हजार, वाहतूक खर्च २५ हजार व अंत्यसंस्कार खर्च पाच हजार लागू नाहीत.