वेळेत उपचार न मिळाल्याने केम येथील महिलेचा वाटेतच मृत्यू

केम( प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील प्रभा पोळके या महिलेला केम येथे रात्रीच्या वेळी वेळेत उपचार न मिळाल्याने, त्यांना कुर्डूवाडी येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर केम परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यात हकीकत अशी की,केम येथील प्रभा पोळके (वय ५२) यांना खोकला व श्वसनाचा आजार होता. काल (दि.7 नोव्हेंबर) रात्री दीडच्या सुमारास त्यांना छातीत जोरात दुखू लागल्याने उपचारासाठी गावातील सर्व खाजगी रूग्णांलयात नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणाकडूनही तेंव्हा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पेशंटला केम मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर पेंशटला जास्तच त्रास होऊ लागल्याने खाजगी वाहन करून त्यांना कुर्डूवाडी येथे उपचारासाठी न्यायचे ठरविले. परंतु वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या महिलेला जर तातडीने उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचू शकला असता, अशी खंत नातेवाईकांनी यावेळी व्यक्त केली.