महावितरणकडून इतरत्र निधी वळवण्याचा संशय; केम ग्रामपंचायतीचे उपोषणाचे रणशिंग -

महावितरणकडून इतरत्र निधी वळवण्याचा संशय; केम ग्रामपंचायतीचे उपोषणाचे रणशिंग

0

केम (संजय जाधव) : सुधारित वितरण प्रणाली (RDSS) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या केम सबस्टेशन ३३/११ केव्हीएसाठी २२० केव्ही जेऊर (करमाळा) सबस्टेशन येथील स्वतंत्र बे व ३३ केव्ही नवीन लाईन निर्माणाच्या कामाला अद्याप प्रारंभ न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात केम ग्रामपंचायतच्या सरपंच सारिका कोरे यांनी महावितरणच्या जेऊर उपविभागाला निवेदन देत, काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली होती.

सदर योजना २०२३ मध्ये मंजूर झाली असून, या अंतर्गत संबंधित कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे व कार्यकारी एजन्सीचीही नियुक्ती झाली आहे. मात्र, कामाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामसभेमध्येही हा विषय चर्चेला आला असून, काम लवकर सुरू करावे, अशी मागणी वारंवार होत आहे.

जर हे काम २३ जून २०२५ पर्यंत पूर्ण न झाल्यास, २४ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता केम सबस्टेशन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असा स्पष्ट इशारा निवेदनातून सरपंच यांनी दिला होता.

आता यानंतर सदर आंदोलनास तयार राहण्याचे आव्हान  करणारे केम ग्रामपंचायतीने एक परिपत्रक काढले असून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहे.  त्यात म्हटले आहे की, मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता जेऊर येथील वीज महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. मागील ९ वर्षांपासून पाठपुरावा करून जेऊर (२२० केव्ही) सबस्टेशनमधून केम सबस्टेशनसाठी स्वतंत्र ३३ केव्ही ८ किमी लाईन व केमसाठी बे मंजूर करून घेण्यात आले आहे. सदरील लाईनचे टेंडर दोन वर्षांपूर्वी झाले असून विजेची बिकट समस्या असताना देखील अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. या निधीचा इतरत्र वापर करण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप या परिपत्रकात करण्यात आला आहे.

औद्योगिक कनेक्शन साठी जेऊर विभागात सर्वात मोठ्या प्रमाणावर बील भरणा करणारे केम गाव असूनही सतत अन्याय सहन करावा लागत आहे. भविष्यातील वाढत्या वीज समस्येला आपणच जबाबदार राहणार आहोत, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन या परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!