रुफटॉप सोलर योजनेत देवस्थान व शाळा-महाविद्यालयांचा समावेश करावा – कलाम फौंडेशनची मागणी

करमाळा(दि.१६): शासनाची सौर ऊर्जा रुफटॉप सोलर पॅनल योजना ही सध्या केवळ घरांसाठी मर्यादित आहे. ही योजना अत्यंत उपयुक्त असून अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून खास अनुदानही दिले जात असून, नागरिक वीज वापरामध्ये स्वावलंबी होत आहेत आणि विजेची मोठ्या प्रमाणावर बचत देखील होत आहे.

मात्र ही योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात यावी आणि फक्त घरापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील विविध महत्त्वाच्या संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी केली आहे.

फाऊंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व धर्मस्थळे – मंदिर, मशीद, बौद्ध विहार, चर्च, गुरुद्वारा यांचा या योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या तसेच नगरपालिका व खासगी संस्थांच्या शाळा-महाविद्यालयांचाही समावेश करून, त्यांनाही विशेष अनुदान देण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

या वेळी समीर शेख, जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, जहाँगीर बेग, आलीम पठाण, फिरोज बेग, कलंदर शेख, इम्तियाज पठाण, मुस्तकीम पठाण, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख आदी उपस्थित होते.


