“वारकरी परंपरेत सामाजिक जाणिवेचा नवा साज – गौंडरे येथील हरिनाम सप्ताह”

करमाळा(दि.१५): करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे श्रीराम नवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत (दि. ६ एप्रिल ते १२ एप्रिल २०२५) दरम्यान हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणारा व आधुनिकतेची कास धरणारा हा सप्ताह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने पारंपरिक कीर्तनासोबतच काळाची गरज ओळखून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. सप्ताह मंडपात संत-महापुरुषांचे प्रेरणादायी सुविचार लावण्यात आले होते. यामध्ये गौतम बुद्धांपासून ते अंतराळवीर सुनीता विल्यम्सपर्यंतच्या विभूतींचा समावेश होता, ज्यामुळे विविध विचारधारांचा संगम अनुभवायला मिळाला.
सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, निबंध, चित्रकला, गायन, वक्तृत्व, बौद्धिक खेळ आणि वेशभूषा अशा स्पर्धांचा समावेश होता. विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम म्हणून यावेळी किर्तनकार व कलाकारांना शाल, श्रीफळ, फेटा न देता वृक्ष देण्यात आला. याशिवाय गावातील सासरी गेलेल्या लेकींसाठी आणि गावात आलेल्या सुनेसाठी दरवर्षी एक झाड लावण्याचा उपक्रम यंदाही राबवण्यात आला. वसुंधरा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाचे सातत्याने आयोजन करत आहे.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाद्वारे समाजात बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न झाला. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती वारकरी मंचावर साजरी करण्यात आली. वारकरी परंपरेत फुले जयंती साजरी करणारा हा बहुदा पहिलाच हरिनाम सप्ताह ठरला.

सप्ताहादरम्यान पर्यावरण रक्षण, विषमुक्त शेती, शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, संत विचार आणि स्वच्छता यांसारख्या विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. प्रा. राखसर यांनी पाणी फाउंडेशनचे विचार मांडले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर करून रसिकांची मने जिंकली.
शेवटच्या दिवशी पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला. श्री ज्ञानेश्वरी पारायण, कृषी व आरोग्य शिबीर, पर्यावरण जनजागृती, शालेय स्पर्धा, वाङ्मयीन कार्यक्रम यांतून समाजप्रबोधन घडले.

सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण गावकरी तसेच इतर गावांतील अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सातही दिवस अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला. समाजात सुख-शांती नांदावी, सलोखा जपला जावा आणि परिवर्तनाचा मार्ग सुकर व्हावा या हेतूने हा सप्ताह एक आदर्श ठरला.

