शेकडो मासे मृत्यूमुखी; उत्तरेश्वर मंदिर बारवेतील घटनेची चौकशी करण्याची मागणी

केम(संजय जाधव): केम(ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान परिसरातील बारवेमध्ये सोमवारी (दि.१४) शेकडो मासे मृत अवस्थेत आढळून आले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेची चौकशी करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ.वर्षाताई चव्हाण यांनी केली आहे.

श्री उत्तरेश्वर हे हेमाडपंथी मंदिर असून याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिर शेजारी असलेली ही बारव उज्जैनच्या राजा क्षेमराजाने उभारल्याचा उल्लेख असून, दर सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. बारव शिवलिंगासारख्या आकाराची असून, भाविक त्यास पवित्र मानतात व त्यात मास्यांना खाऊ टाकतात.


सध्या उन्हाळा सुरू असल्याने बारवेत पाण्याची पातळी घटली आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी पाणी काढल्याने उरलेले थोडेसे पाणी उन्हामुळे तापले व त्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी अन्नछत्र वर्धापन दिन असल्यामुळे मंदिरात मोठी गर्दी होती व मासे मृत अवस्थेत दिसल्याने अनेक भाविकांनी चिंता व्यक्त केली.

देवस्थान कमिटीचे स्पष्टीकरण:
या संदर्भात विचारले असता देवस्थान कमिटीचे सचिव मनोज सोलापूरे म्हणाले, “शेतकऱ्यांना पाणी पूर्णपणे खरडून काढू नये असे सांगण्यात आले आहे. तसेच पौर्णिमेला येणाऱ्या कावडयांच्या गुलालामुळेही पाण्यावर परिणाम झाला असावा, असे आमचे मत आहे.”
कावड धारकांचे उत्तर:
कावड धारक कुंडलिक तळेकर व सचिन तळेकर यांनी याबाबत स्पष्ट केले की, “कावड मंदिरात घेऊन गेलो होतो, मात्र गुलाल बारवेत पडलेला नाही. आमच्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत.”
चौकशी व्हावी!
“या मासेमृत्यूला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी चौकशी व्हावी. तसेच पाण्याचे योग्य नियोजन व्हावे,” अशी मागणी सौ. वर्षा ताई चव्हाण यांनी केली आहे.


