सालसे येथे दहिगाव पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

करमाळा(दि.१६): दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी टेल भागात मिळावे, या मागणीसाठी काल(दि.१५) घोटी गावचे सरपंच विलास राऊत आणि निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर यांच्या नेतृत्वाखाली सालसे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जोपर्यंत दहिगाव योजनेचे पाणी आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत रस्ता रोको सुरूच राहील.” यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची दखल घेत करमाळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद घुगे यांच्या बंदोबस्तात पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी राजगुरू आणि महसूल विभागाचे सर्कल अधिकारी वळेकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने ‘दहिगाव योजनेचे पुढील प्रत्येक आवर्तन टेल टू हेड पद्धतीने सोडले जाईल’ असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

लेखी निवेदनानुसार, १६ एप्रिल २०२५ च्या सायंकाळपर्यंत टेल भागात पाणी पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पुढील आवर्तनांमध्ये टेल टू हेड पद्धतीनेच पाणी वितरण होईल.
या आंदोलनात विलास काका राऊत, रवींद्र वळेकर, शिवाजी राऊत, प्रशांत शेंडे, बाळासाहेब राऊत, सतिश राऊत, धनाजी राऊत, तानाजी ननवरे, आमोल भोसले यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांच्या संतप्त भावना व्यक्त करताना सरपंच विलास राऊत म्हणाले, “दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन नियोजनाअभावी कोलमडले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या योजनेवर २४ गावांचा अवलंब असल्याने हा प्रश्न गंभीर आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दोष नसताना लोकप्रतिनिधींच्या अतिहस्तक्षेपामुळे सर्वच यंत्रणा कोलमडली आहे.


