अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई निधी द्यावा - माजी आमदार नारायण पाटील - Saptahik Sandesh

अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई निधी द्यावा – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करमाळा तालूक्यात झाली असून सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील सर्व तहसील तथा कृषी मंडल मधील पर्जन्यमान पाहता काही ठिकाणी कमी अधिक पाऊस असेल परंतू जवळपास सर्वदूर पाऊस झाल्याने खरीपाची पिके वाया गेली आहेत.तर काही ठिकाणी पेरणी तथा मागास पेरणीसही पावसाने उसंत दिली नाही.

तालूक्यातील केम, उमरड, कोर्टी, अर्जुननगर, सालसे, जेऊर, करमाळा, केत्तुर, पांगरे, पोथरे, जिंती या मंडलमधे शेती पिकांचे नुकसान दिसून येत आहे. उडीद, मका, सोयाबीन,तूर या पिकांचे नुकसान झाले असून खरबूज, कलिंगड, काकडी आदिसह भाजीपाला व फळबागेवरही अतिवृष्टीमुळे संकट कोसळले आहे. तरी तहसील व कृषी विभागाकडून तातडीने पिक नुकसान पाहणी व कार्यस्थळावर जाऊन पिक पंचनामे केले जावेत व नुकसान भरपाई अहवाल तयार केला जावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी या निवेदनातून केली आहे.

करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आता सरकारच्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसलेले असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जेऊर मंडल मध्ये तालुक्यातील सर्वाधिक पावसाची नोंद असून जेऊर व परिसरातील दहा पंधरा गावातील उभी पिके जळून गेली आहेत. पिके, फळबाग व तरकारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकुण इतर मंडल मध्येही याहून वेगळी स्थिती नसल्याने करमाळा तालूक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा इतकी गंभीर परिस्थिती आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या निवेदनाद्वारे केलेल्या पंचनामे व नुकसानभरपाई अहवाल मागणीस प्रशासनाकडून गतिमानता येऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Panchnama should be made for the damage caused to agriculture due to heavy rain and compensation fund should be given – Former MLA Narayan Patil | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!