अनुदान विहिरीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी २५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत : गटविकास अधिकारी मनोज राऊत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना नवीन वैयक्तीक सिंचन विहिरीच्या कामासाठी अर्ज मागविण्यात येणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी २५ जानेवारी पर्यंत विहित नमुन्यात ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावेत; असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ४ नोव्हेंबर २०२२ मधील प्राप्त सूचनेनुसार वैयक्तीत सिंचन विहिर कामासाठी ग्रामपंचायत मार्फत अर्ज प्राप्त केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे अर्ज जिल्हा परिषदेकडे न पाठवता पंचायत समितीकडेच मंजूर केले जाणार आहेत. या अर्जासाठी सातबारा, आठ अ व सहा ड व फेरफार उतारा आवश्यक असून गटामध्ये विहिर अथवा बोअर असू नयेत. शासकीय पाणीपुरवठा विहिरीपासून ५०० मीटर पेक्षा जास्त अंतर असावे.
या विहिरीचा प्राधान्यक्रम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधीसूचीत जमाती, दारिद्रयरेषेखालील कुटूंबे, स्त्री कर्ता असलेले कुटूंबे, शारिरीकदृष्ट्या विकलांग असलेली कुटूंबे, जमिन सुधारणेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अडीच एकरा पर्यंतचे लाभार्थी, अल्पभुधारक (५ एकर) असा प्राधान्यक्रम असणार आहे. यासाठी २६ जानेवारीला ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थी यादी व ग्रामसभा ठराव १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पंचायत समितीकडे सादर करावा लागणार आहे; या विहिरीसाठी ४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, असेही श्री.राऊत यांनी सांगितले आहे.
