फुलहार ऐवजी मूठभर धान्य द्या - पै.डॉ.तानाजीभाऊ जाधव - Saptahik Sandesh

फुलहार ऐवजी मूठभर धान्य द्या – पै.डॉ.तानाजीभाऊ जाधव

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : राजकारणात जास्त रस नसून, समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा टायगर ग्रुपचा मनोदय आहे. त्यादृष्टीने टायगर ग्रुपची सामाजिक वाटचाल महाराष्ट्रभर चालू असून, आत्तापर्यंत अनेक संकटात जनतेला मदत केली आहे. २ नोव्हेंबरच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी फुलहार न आणता व अन्य वायपट खर्च न करता मुठभर धान्य जमा करावे. हे धान्य अनाथ आश्रम व गरीब लोकांना देण्यात येणार आहे; अशी माहिती टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी (भाऊ) जाधव यांनी केले आहे.

तानाजी जाधव यांचा २ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्त सा.संदेशशी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की टायगर ग्रुपच्या माध्यमातून अन्नदान, रक्तदान, वृक्षारोपण बरोबरच गोरगरीब जनतेला मदतीचा हात दिला आहे. वाढदिवसाला संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत. 

वाढदिवसाच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय मान्यवर उपस्थित राहत असलेतरी ते आपल्या प्रेमापोटी उपस्थित राहत आहेत. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. राजकारणापेक्षा आपल्याला समाजसेवेत जास्त रस आहे. त्यामुळे टायगर ग्रुपने सामाजिक भुमिका घेऊन राज्यातील अनेक भागातील जनतेला वेगवेगळ्या संकटात मदत केली आहे.

केरळ येथे महापूर आला होता, त्यावेळी रेल्वेचे डबा भरून कपड़े व अन्य सामान टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी तेथील नागरीकांना मदत केली होती. तसेच कोल्हापूर येथे आलेल्या महापुराने अनेक शेतकऱ्यांचे संसार पाण्यात बुडाले होते. त्यावेळी ट्रक, टेम्पो अशा ३३ वाहनातून कपडे, अन्न अशाप्रकारची मदत केली होती. कोरोनाच्या काळातही मास्क, सॅनेटायझर व किराणा किटचे वाटप केले आहे. कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोलापूर येथे अडचणी येत होत्या. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यानी अंत्यविधीसाठी पुढाकार घेऊन मयताच्या कुटूंबियांना मदत केली आहे. अशाप्रकारे टायगर ग्रुप सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. 

यापुढेही राजकारणापेक्षा समाजसेवेला जास्त महत्व देऊन जास्तीत जास्त गोरगरीबांची सेवा टायगर ग्रुपच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना मदत करण्यासाठी टायगर ग्रुप सरसावला आहे. २ नोव्हेंबरच्या वाढदिवसा निमित्ताने धान्य गोळा करण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुष्पहार किंवा अन्य कार्यक्रमावर खर्च न करता मुठभर धान्य गोळा करण्याची मोहिम राबवून जास्तीत जास्त धान्य गोळा करावे. हे धान्य अनाथाश्रम किंवा ज्या लोकांना अन्न खायला नाही अशा गोरगरीबांना वाटण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!