राजुरी येथील ग्रामदैवत यात्रा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न.. - Saptahik Sandesh

राजुरी येथील ग्रामदैवत यात्रा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री बाळनाथ स्वामी महाराजांची यात्रा ‘अक्षय तृतीया’ला मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्तीच्या आखाड्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी हजेरी लावली तर शेवटच्या कुस्तीसाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.

यात्रे दिवशी आंबील, शेरनी या धार्मिक विधीनंतर रात्री बारा वाजता बाळनाथाच्या छबिन्याची सवाद्य मिरवणूक निघाली .पारंपारिक लेझीम व ताशा यासह आधुनिक डीजे या वाद्यांचा यामध्ये समावेश होता. गावातील सर्व आबाल वृद्धांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद लुटला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी चार वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरण्यात आले होते.

या कुस्ती मैदानासाठी बारामती ,इंदापूर, भिगवन, नगर, राशीन, अकलूज, टेंभुर्णी,कर्जत, इंदापूर या सह करमाळा तालुक्याच्या विविध गावातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेक नामांकित पैलवानांच्या कुस्त्या जोडण्यात आल्या होत्या.
या कुस्ती आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा मल्ल, मुंबई महापौर केसरी व महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध निरावागज बारामतीचा मल्ल भारत मदने यांच्यात झाली. या कुस्तीसाठी इनाम रक्कम एक लाख रुपये व बाळनाथ केसरी हा किताब आणि चांदीची गदा ठेवण्यात आली होती.
दोन्ही पैलवानांनी कुस्ती निकाली होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण शेवटी या दोघांमधील कुस्ती अनिर्णित अवस्थेत संपली.

या कुस्तीची इनाम रक्कम दोन्ही मल्लांना विभागून देण्यात आली. शेवटच्या कुस्तीसाठी करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले .या कुस्ती मैदानासाठी राजुरी येथील उद्योजक मनोजशेठ सोळंकी यांनी ७५ हजार, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर यांनी २५ हजार रुपयांची तसेच गावातील कुस्तीप्रेमी ग्रामस्थांनी मोठ्या रकमेच्या देणगी दिल्या होत्या. मैदान यशस्वी करण्यासाठी श्री बाळनाथ यात्रा कमिटी परिश्रम घेतले तर या कुस्ती मैदानाचे सूत्रसंचालन प्रख्यात कुस्ती निवेदक धनंजय मदने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!