सोशल मिडियाचा आधार घेत प्रिंट मिडिया मजबूत करणे गरजेचे - ज्येष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबूराव हिरडे - Saptahik Sandesh

सोशल मिडियाचा आधार घेत प्रिंट मिडिया मजबूत करणे गरजेचे – ज्येष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबूराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
सोशल मीडियामुळे जग मुठीत आले आहे, प्रत्येक ठिकाणी घडलेली घटना एका सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचते, मात्र त्या घटनेचे सविस्तर संकलन करून ही घटना का घडली व त्याचे होणारे परिणाम यावर पत्रकारांनी लिखाण केले तर प्रिंट मीडिया वाचकांच्या मनात घर निर्माण करेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ॲड.डॉ.बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.

करमाळा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेत ॲड.हिरडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, जेष्ठ पत्रकार नासिर कबीर, जयंत दळवी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते, याप्रसंगी पुढे बोलताना ॲड.हिरडे म्हणाले की, सोशल मीडिया हा सुद्धा एक प्रिंट मीडियाला वरदान ठरत आहे, सोशल मीडियाचा तिरस्कार न करता, त्याचा वापर आपल्या प्रिंट मीडियासाठी कसा करून घेता येईल याकडे पत्रकारांनी लक्ष देणे गरजेचे आहे, सोशल मीडियावर येणारी बातमी ही दोन मिनिटांची असते, पण प्रिंट मीडियातील पत्रकारांना या बातमीचे महत्त्व आपल्या लेखणीतून मांडता आले पाहिजे वाचकांना सुद्धा सविस्तर वृत्त वाचण्याची आवड असते.

अपघातात दोन जणांचा मृत्यू अशा प्रकारची बातमी सोशल मीडिया व वृत्तपत्र चॅनलवर जरी आली तरी त्याचा संदर्भ वाचकांना प्रेक्षकांना लागत नाही, मात्र प्रिंट मीडियामध्ये अपघात कशामुळे झाला, अपघात कुठे झाला अपघातग्रस्त गाड्यांचे नंबर मृत व्यक्तींचे नाव जखमींचे नाव यासाठी जखमींना उपचारासाठी कुठे दाखल केले ? अपघात स्थळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली का ? शासकीय ॲम्बुलन्स सेवा तिथे तत्परतीन उपलब्ध झाली का ? अशा अनेक बाबीचा सविस्तर उल्लेख प्रिंट मिळेल त्या बातमीत आपल्याला करता येतो व वाचकांनाही सविस्तर बातमी वाचल्यानंतरच समाधान मिळते.

सोशल मीडिया हा प्रिंट मीडियाचा कधीही स्पर्धक होऊ शकत नाही किंबहुना प्रिंट मीडियावर सोशल मीडिया कधीही मात करू शकत नाही, लोकांचा वृत्तपत्रावर जो विश्वास आहे तो चैनल वर व सोशल मीडियावर नाही, त्यामुळे किती जरी स्पर्धा वाढली तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी होणार नाही अशी भूमिका ॲड. बाबुराव हिरडे यांनी मांडली. याप्रसंगी अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!