हॉटेलसाठी गोमांस खरेदी-विक्री करणाऱ्या तिघांवर करमाळा पोलिसांनी केली कारवाई - Saptahik Sandesh

हॉटेलसाठी गोमांस खरेदी-विक्री करणाऱ्या तिघांवर करमाळा पोलिसांनी केली कारवाई

करमाळा(दि.१४) : हॉटेल व्यवसायासाठी गोमांस खरेदी व विक्री करणाऱ्या तिघांविरोधात करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. जातेगाव (ता. करमाळा) येथील एका हॉटेलवर पोलिसांनी ८ जानेवारीला ही कारवाई केली आहे. यात पोलीस शिपाई तौफिक रज्जाक काझी यांनी फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा-अहमदनगर (अहिल्यानगर) महामार्गावर जातेगाव जवळ असलेल्या अलवर मेवात या हॉटेलमध्ये गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती गोपनीय बातमीदार मार्फत पोलिसांना   मिळाली होती. ८ जानेवारी रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास पोलिसांनी पथक तयार करून हॉटेलवर धाड टाकत पाहणी केली. केलेल्या पाहणीत हॉटेलच्या किचनरूम मध्ये एका प्लॅस्टीकच्या पिशवी मध्ये अवैध गोवंश जातीच्या प्राण्याचे सदृश मांस मिळून आले. त्याबाबत हॉटेल चालकाकडे  याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने सदरचे मांस शाकीर कुरेखी, रा. करमाळा यांच्या कडून खरेदी केले असल्याचे सांगितले.  शाकीर कुरेखी हे गायी कापुन हॉटेलला सदरचे मांस पुरवत असल्याचे देखील माहिती त्याने पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी दहा किलो गोवंशाचे मांस जप्त केले.

सदरचे मांस हे गोवंश जातीचे आहे का की दुसरे ही खात्री करण्यासाठी पोलिसांनी करमाळा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्याबाबत खात्री करून घेतली.  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे मांस गोवंश जातीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी १) शाकीर कुरेखी, रा. करमाळा २)  रहमत मल्लु खान, रा धोली कोबी मोजपुर, अलवर राजस्थान ३) दिपक काकडे रा जातेगाव, ता.करमाळा (हॉटेल मालक) ता करमाळा यांचेविरुध्द भा.न्य. सं. 325, सह कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1976 चे कलम 5 ( अ ), 5 (क), 6, 9 व 9 (अ) प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक एस.डी. चंदनशिव, सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल डोंगरे,पोलीस शिपाई तौफिक काझी, पोलीस नाईक गव्हाणे आदींनी ही कारवाई केली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!