करमाळ्यातील युनियन बॅंकेचा स्थलांतर कार्यक्रम संपन्न.. - Saptahik Sandesh

करमाळ्यातील युनियन बॅंकेचा स्थलांतर कार्यक्रम संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : युनियन बँकेने नेहमीच ग्राहकाभिमुख सेवा दिली असून, यामुळेच युनियन बँक व्यवसायात अव्वल ठरली आहे, भविष्यात अशीच सेवा देऊन युनियन बँक करमाळा शाखा तालुक्यात मोठा नावलौकिक मिळविल असा विश्वास बँकेचे फिल्ड जनरल मॅनेजर राजीव पटनायक यांनी व्यक्त केला. युनियन बँक करमाळा शाखा स्थलांतर समारंभात ते बोलत होते.


 
यावेळी बँकेचे अहमदनगर विभागीय प्रबंधक अश्वनी कुमार सिन्हा तसेच अन्य अधिकारी उपस्थीत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, विनम्र सेवा व ग्राहक हित जोपासल्या मुळेच ग्राहकांचा नेहमीच युनियन बँकेवर विश्वास राहिला आहे. ग्राहकांना बँकिग प्रणालीचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. ग्राहकांनी छोटे कर्ज वेळेवर भरले तर भविष्यात छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे वेळेवर कर्ज भरून आपली पत सुधारावी.बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अश्वनी कुमार सिन्हा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रारंभी दीप प्रज्वलन व फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कमलादेवी रोड ,पेट्रोल पंपाच्या समोर भव्य दिव्य अशा वास्तूत या शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

शाखा व्यवस्थापक महादेव तिकटे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना शाखेच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला.यावेळी बोलताना ते म्हणाले की, युनियन बँक करमाळा शाखेचा सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग नेहमीच ग्राहक हित जोपासत आला आहे. सर्वसामान्य शेतकरी,शेतमजूर,व्यापारी,तसेच व्यावसायिकांना चांगली सेवा देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. यापूर्वीच्या जागेवर ग्राहकांना सेवा देताना अडचणी येत होत्या त्यामुळेच आम्ही सुसज्ज अशा जागी बँकेचे स्थलांतर करत आहोत. यापुढेही अशीच सेवा देणार आहोत. ग्राहकांनी याअगोदर जसा प्रतिसाद दिला तसाच यापुढेही देण्याचे त्यांनी आवाहन केले.

ग्राहकांच्यावतीने अतुल वारे यांनी शाखा व्यवस्थापक महादेव तिकटे व त्यांच्या स्टाफच्या कामाचे कौतुक करत ही बँक समाजाच्या सर्व थरातील ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण विकास अधिकारी श्रीकांत धांडे,उप शाखा व्यवस्थापक जितेंद्र कुमार, लेखाकार सुशांत पाल,अभिजीत कोमलवार,शिलादेवी भोसले,बँकमित्र सोमनाथ कामटे,कपिल यादव यांनी परिश्रम घेतले. यावेळी करमाळा शहर व तालक्यातील युनियन बँकेचे ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!