आईच्या उपचारासाठी काढलेले एक लाख रुपये रस्त्यात गहाळ - पठाण यांच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले परत - Saptahik Sandesh

आईच्या उपचारासाठी काढलेले एक लाख रुपये रस्त्यात गहाळ – पठाण यांच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले परत

करमाळा(दि.९) : हरवलेली एक लाख रुपये रक्कम असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याने करमाळा येथील जाकीर हिदायत पठाण यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत हकीकत अशी की, वरकटणे (ता.करमाळा) येथील गणेश माने यांनी त्यांच्या आईच्या उपचारासाठी पैसे काढले होते.   हे पैसे त्यांनी एका डब्याच्या पिशवीत ठेवले होते. शनिवार, दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास स्कुटीवरून जात असताना त्यांच्या नकळत ही पिशवी रस्त्यावर पडली. याच दरम्यान, अभिजीत वाशिंबेकर यांच्या दुकानात गाठण्याचे (पटवेगिरी) काम करणारे जाकीर पठाण यांना ही पिशवी रस्त्यात सापडली. कोणीतरी विचारल्यास परत द्यायची या प्रामाणिक भावनेतून त्यांनी ती पिशवी स्वतःकडे सुरक्षित ठेवली.

सुमारे दीड तास कोणीतरी शोधत येईल या आशेने त्यांनी वाट पाहिली. अखेर त्यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यात मोठी रक्कम असल्याचे लक्षात आले. तरीही त्यांनी ती पिशवी न उघडताच नमाज अदा करण्यासाठी जाताना ती पिशवी त्यांनी वाशिंबेकर ज्वेलर्सचे मालक अभिजीत वाशिंबेकर यांच्याकडे सुरक्षित ठेवली.

यानंतर ते मस्जिद जवळ गेले असता त्यांना गणेश माने हे चिंतेत दिसले. त्यांनी आपली पिशवी हरविल्याची माहिती दिल्यावर जाकीर पठाण यांनी आपल्याला एक पिशवी सापडल्याचे सांगून ती त्यांचीच असल्याची खात्री करून दिली. अखेर माने यांना आपली हरवलेली पिशवी आणि एक लाख रुपये परत मिळाले.

गणेश माने यांनी आनंद व्यक्त करत जाकीर पठाण यांचे मनापासून आभार मानले. “दुसऱ्याचे पैसे घेऊन आपल्याला काही उपयोग नाही, प्रामाणिकपणे कमावलेलेच पैसे टिकतात” असे जाकीर पठाण यांनी नम्रपणे सांगितले. त्यांच्या या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यानंतर जाकिर पठाण यांचे व्यापारी वर्गाने सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.  यावेळी अभिजीत वाशिंबेकर, चेतन किंगर, अभिनव देवी, लखन ठोंबरे, विकास कटारिया आदीजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!