आळसुंदे-वरकुटे शिव रस्त्याच्या कामाला पुन्हा खोडा

करमाळा(दि.२८): – तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार काल शुक्रवारी (दि.२८) आळसुंदे-वरकुटे शिवरस्ता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासह खुला करण्यास सुरुवात केली. मात्र प्रशासनाने ठरविलेल्या मार्गात लिंब जातीच्या झाडांसह इतर प्रतिबंधित झाडे येत असल्याने ही झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने दुपारी पावणेचार वाजता हा रस्ता करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
हा रस्ता गेले वीस वर्षांपासून प्रलंबित असून आळसुंदे येथील राणा वाघमारे हे दि.२४ फेब्रुवारीला उपोषणाला बसले होते. त्यानंतर दि.२५ फेब्रुवारीला तहसीलदार ठोकडे वाघमारे यांचे उपोषण थांबवण्यासाठी हा रस्ता खुला करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू होती. करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावर उजव्या बाजूला सदर विवादीत शिव रस्ता आहे. मात्र शिव रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी दोन्हीकडून आपला हक्क सांगितल्यामुळे डांबरी रस्त्यापासून साडे सतराशे फुटांपर्यंतचा हा शिव रस्ता गायब झाला आहे.
वाघमारे यांच्या उपोषणानंतर प्रशासनाने शुक्रवारी दोन्ही बाजूंकडून पाच-पाच फूट रस्ता करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सुमारे साडेपाचशे फुटांपर्यंत हा रस्ता करण्यात आला. या पुढील मार्गात बरीचशी झाडे येत असतानाही ही झाडे तोडून हा रस्ता करण्याचे काम सुरूच होते. यावेळी इतर झाडांसह काही लिंब जातीची झाडेही तोडण्यात आली. माध्यम प्रतिनिधीकडून या वृक्षतोडीचे चित्रीकरण सुरू असतानाच या झाडांना तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे तहसीलदार ठोकडे यांच्या लक्षात आले आणि या परवानगीसाठी शुक्रवारी दुपारी ही कारवाई थांबवण्यात आली आहे.
भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीक्षक प्रिया पाटील यांनी दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना मान्य असलेल्या खुणेच्या दोन्ही बाजूंनी पाच-पाच फूट रस्ता करण्याचा निर्णय घेतला आणि सदर शेतकऱ्यांना हा पर्याय मान्य नसतानाही हा रस्ता खुला करण्यास सुरुवातही झाली. यावेळी हा रस्ता केवळ आपल्याच हद्दीत येत असल्याने विरोध करण्यासाठी पुढे आलेल्या एका शेतमालकास पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही मिळाला. मात्र प्रतिबंधित झाडांच्या परवानगीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी ही कार्यवाही स्थगित करण्यात आली.






