करमाळा अर्बन बँकेवरील निर्बंध उठवले – बँकेची निवडणूक जाहीर

करमाळा(दि.९): करमाळा अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जुलै २०२२ मध्ये टाकलेले निर्बंध आज (ता. ९) मागे घेतले आहेत. त्यामुळे प्रशासकाची कारकिर्द संपून बँकेचे कामकाज नियमित सुरू होणार आहेत. दरम्यान बँकेची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ११ एप्रिल शेवटची तारीख आहे.

करमाळा अर्बन बँकेच्या कर्जाच्या वसुलीस काही अडचणी आल्याने रिझर्व्ह बँकेने २८ जुलै २०२२ च्या दरम्यान निर्बंध टाकले होते. त्यावेळी फक्त १० हजार रूपये खातेदारांना देण्याची मुभा होती. त्यानंतर ती रक्कमही देण्यावर निर्बंध घातले. त्यामुळे खातेदार विशेषतः ठेवीदार अडचणीत आले होते. प्रशासक आल्यामुळे संचालक मंडळास कामकाज करता येत नव्हते. २१ एप्रिल २०२३ ला सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांची प्रशासक पदी नेमणूक झाली होती. त्यांनी बँकेच्या उर्जितावस्थेसाठी चांगले प्रयत्न केले होते. ३ ऑक्टोबर २०२३ ला रिझर्व्ह बँकेने विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मान्यता दिली होती. त्यानुसार बँकेची बऱ्यापैकी वसुली झाली आहे. सध्या निर्बंध हटवल्यामुळे ग्राहक, खातेदार, ठेवीदार तसेच पूर्वीच्या संचालक मंडळाने आनंद व्यक्त केला आहे.

बँकेरील निर्बंध उठविल्यामुळे बँकेचे कामकाज सुरळीत सुरू होईल. ठेवीदारांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून जो संयम पाळला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बँकेची निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक सर्व सभासदांनी बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली होती व आहे. परंतु वरीष्ठांच्या निर्बंधामुळे ठेवीदारांच्या रकमा वेळेवर मिळाल्या नाहीत. यापुढे सर्वांच्या रकमा व्यवस्थित मिळतील व सर्व व्यवहार सुरळीत चालतील. याकामी सर्व सभासदांनी सहकार्य करावे.
● कन्हैयालाल देवी (मा.चेअरमन, करमाळा अर्बन बँक)




