वकीलीक्षेत्रात वेळेचा सदुपयोग केला तरच प्रगती – ॲड.बी.डी.कट्टे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वकीलीक्षेत्रात वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त अभ्यास केला तरच वकीलांची प्रगती होऊ शकते, असे मत सोलापूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.बी.डी.कट्टे यांनी व्यक्त केले.

करमाळा वकील संघाच्यावतीने महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौन्सिलच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ एन.डी. रोकडे व ॲड. बी.डी. कट्टे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ॲड. कट्टे बोलत होते. तसेच टेंभुर्णी येथील शिवविचार प्रतिष्ठानने ॲड.डाॅ. बाबूराव हिरडे यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानीत केले. त्याबद्दल करमाळा वकील संघ व करमाळा न्यायालयाचेवतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश सौ.मीना एखे या होत्या .व्यासपीठावर न्यायाधीश आर.एस शिवरात्री, वकीलसंघाचे अध्यक्ष ॲड. विकास जरांडे , उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव सचिव ॲड. योगेश शिंपी, ॲड. क्षीरसागर (मोहोळ), ॲड. पाटील हे होते. पुढे बोलताना ॲड.कट्टे म्हणाले की.. वकील हा कामातूनच शिकत असतो व त्यातूनच तो मोठा होतो. त्यामुळे वकीलांनी सतत कार्यरत राहीले पाहिजे. मला जो पुरस्कार मिळाला त्यात करमाळा वकील संघाच्या सदस्यांचा मोठा वाटा आहे व त्यांचे आभार मानण्यासाठी मी करमाळा येथे आलो आहे.
यावेळी न्यायाधीश एखे मॅडम, ॲड. एन.डी. रोकडे, ॲड. कमलाकर वीर, ॲड.डाॅ. बाबूराव हिरडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांनी केले. उपस्थितांचे स्वागत वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विकास जरांडे, सचिव ॲड. योगेश शिंपी यांनी केले.तर आभार ॲड. अजित विध्ने यांनी मानले. यावेळी सर्व विधीज्ञ मोठे संख्येने उपस्थित होते.

