सालकरी गडी झाला वायरमन – आता लवकरच होणार उद्योजक..
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.1) : प्रगती करणाऱ्याला आकाशसुध्दा ठेंगण पडतं… काम न करणाऱ्यांना घराच आंगणसुध्दा मोठं वाटतं…कामाची दिशा ठरली आणि सोबत मेहनत असली की, कठीणातील कठीण कामही सहज होते… अगदी तसंच झालय, पोथरे (ता.करमाळा) येथील वायरमन नवनाथ उर्फ पप्पू नंदरगे यांच…!
पप्पू नंदरगे यांचा वाडवडीलार्जीत लोहारकीचा व्यवसाय, वडील तुळशीराम नंदरगे यांनी संपुर्ण आयुष्यभर करमाळा शहरात जाऊन सुतारकीचे काम केले. आई हिराबाई घरातील काम करत शेतात काम करत होत्या. भाऊ नागा हा स्वतःच्याच विचारात कायम गुंगून गेलेला होता. बहिण सौ.विजया बापूराव वाघमारे ही पारनेर येथे आपल्या संसारात गुंतून पडलेली आहे.
थोडक्यात पप्पूच्या लहानपणापासून घरात अलबेल नव्हते. दररोज खाण्याच्या प्रश्न पडलेला होता. त्यामुळे पप्पूला सातवीच्या पुढे शिकणे अशक्य होते. त्यामुळे पप्पू यांनी सातवी झाली की, बाबूराव वांळुजकर यांचे शेतात तब्बल 10 वर्षे मजूर म्हणून काम केले. 1998 पर्यंत मजूरी केल्यानंतर पप्पू यांनी वायरमन होण्याचे स्वप्न पाहिले. पण ना जादा शिक्षण, ना आय टी आय , ना ट्रेनिंग, ना वशीला… पण पप्पू आपल्या स्वप्नावर ठाम होता. इकडे तिकडे काम करत त्यास लातूर भागात नवीन लाईन ओढण्याचे काम सुरू असल्याचे समजले.
त्यानंतर ना कोणाची ओळख ना कोणाचा संपर्क तरीही हातात गाडीखर्चीचे पैसे घेऊन पप्पूने लातूर भागातील बाभूळगाव गाठले. ठेकेदाराला विनवणी करून लेबर म्हणून 200 रूपये रोजाचे काम मिळवले आणि तेथूनच वायरमनचा प्रवास सुरू झाला.
खरंतर कोणत्याही क्षेत्रात शिकवा म्हणून कोणी शिकवत नसते. केवळ लेबर म्हणून काम करूनही कोणी शिकत नसतो. पप्पू संबंधित ठेकेदाराला एवढी मदत करत असे की. ठेकेदार स्वतःच जोखमीची कामे सांगू लागला. जिथे आडेल तिथे समजून सांगू लागला. पहाता पहाता तीन वर्षात पप्पू वायरमन म्हणून प्रॅक्टिकली फीट झाला पण हातात डिग्री नव्हती.
सन 2016 ला पप्पूने वीज वितरण कंपनीचे ठेकेदार अमोल महाडिक यांचेकडे काम सुरू केले. लेबर भरणे व पोल रोवणे, तारा ओढणे, डी.पी. बसवणे अशी कामे सुरू केली. पप्पूचे सतत काम आणि परिपूर्ण काम ही बाब त्यावेळचे उपअभियंता प्रविण राऊत यांचे निदर्शनास आली. त्यांनी पप्पूला कंत्राटी वायरमन म्हणून नेमले व पोथरे येथे काम सुरू केले.
पोथरे येथे काम करताना गावातून नेहमीच हेळसांड झाली, पण पप्पूने त्याचा कधी विचार केला नाही, काम सुरूच ठेवले, या कामाबरोबरच पत्नी सौ.शुभांगी हिच्या सहकार्याने गावात शेती वाट्याने करण्याचे काम सुरू केले. वाट्याच्या शेतीत ऊस पिकवला आहे.. आज पप्पूकडे साडेसहा एकर जाणारा ऊस असून नवीन 11 एकर ऊसाची लागवड आहे.नोकरीला पर्याय निर्माण केला. कोणतेही व्यसन नाही ,जोडीला कल्पकदृष्टी, रात्रंदिवस मेहनत करण्याची तयारी यातूनच पप्पू यांनी आपली प्रगती केली आहे. हा प्रवास येथेच थांबत नाही तर यापुढे पप्पू यांचा वेगळा प्रवास आहे. पोथरे गावाच्या बसस्थानकाजवळ पाच गुंठे जागा घेतली असून तेथे एक नवा उद्योग उभारण्यासाठी पप्पू नंदरगे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा … पप्पू नंदरगे यांचे आज १ जानेवारी २०२३ रोजी असलेल्या 38 व्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा…!