वाळू प्रकरणामुळे वातावरण तापले!

करमाळा(दि.१) : दि.२९ रोजी बोरगाव येथील दोन व्यक्तींनी वैयक्तिक कामासाठी सीना नदीतुन वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी मध्यस्थी करताना झालेल्या वादात त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर शंभूराजे जगताप व त्यांचे वडील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत आरोपांचे खंडन करत दोघांनीही पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर व निष्क्रियतेवर कडाडून टीका केली. यामुळे करमाळ्यात वाळु प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

वाळू चोरी बाबत करमाळा पोलीस स्टेशन मध्ये दि.२९ मार्च रोजी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल शहाजी रंदील (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बोरगाव हद्दीत अवैध वाळु चोरी चालु होत असल्याची बातमी खास खब-या मार्फत मिळाली. त्यानंतर मी व माझे सोबत पोलीस कॉन्स्टेबल वलटे, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, पोलीस नाईक चौधरी असे आम्ही तिथे कारवाई करण्यास गेलो.
बोरगाव येथे सिना नदीच्या पात्रात गेलो. सायंकाळी ५ च्या सुमारास गेलो असता आम्हास नदी पात्रात एक ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह सिना नदी पात्रातुन वाळु काढुन ठिक्यात भरून ठेवत असलेला दिसला. आम्ही लागलीच तलाठी श्री रोहन विकास बोराडे रा केडगाव यांना फोन करुन बोलावुन घेतले. अक्षय शिंदे व गणेश गायकवाड रा बोरगाव असे वाळू चोरी करणाऱ्यांची नावे असून त्यावेळी त्या ठिकाणी शंभुराजे जगताप व त्यांचे सोबत विशाल शिंदे व इतर चार ते पाच लोक मोटारसायकल वर आले. त्यावेळी शंभुराजे जगताप यांनी,”तुम्ही या ठिकाणी का आला?” असे म्हणुन आम्हास तुम्ही वाळु चोरी पासुन रोखणारे कोण तुमचा इथे येण्याचा संबंध काय असे म्हणुन आम्ही सरकारी काम करीत असताना अडथळा आणुन आम्हा सर्वांना धमकी देवुन वाळु चोरी करणारे ट्रॅक्टर चालक अक्षय शिंदे यास तु ट्रॅक्टर घेवुन जा कोण काय करतय ते बघतो असे म्हणुन दमदाटी केली. शंभूराजे व त्यांच्या सोबतचे विशाल शिंदे व इतर चार ते पाच लोकांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरसह पळवुन लावुन सरकारी कामात अडथळा आणला आहे. त्यानंतर तलाठी रोहन बोराडे यांनी आम्हा पोलीस व पंचास बोलावुन घेवुन पंचासमक्ष सदरचे चोरीसाठी काढलेले वाळुचे ठिकाणचा व वाळु भरलेल्या ठिकाणचा पंचनामा केला आहे. अक्षय विठ्ठल शिंदे व गणेश गायकवाड दोघे रा बोरगाव ता करमाळा यांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या सिना नदी पात्रातील 50,300 /- किंमतीची दोन ब्रास वाळु काढत पर्यावरणाचा -हास करुन व गौण खनिजचे उत्खनन केले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शंभूराजे जगताप यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या आरोपाचे खंडन करताना सांगितले की, वास्तविक वाळू चोरी करणारा व्यक्ती हा एक गरीब शेतकरी असून तो मंजूर झालेल्या घरकुलातून तो स्वतःच्या घराचं काम करत आहे. त्याच्या खिडकीला फरशी बसवण्यासाठी कच चा उपयोग होत नसल्याने लागणारी थोडी वाळू नदीपात्रातून घेण्यासाठी तो गेला होता. पोलिसांना याबाबत कोणीतरी माहिती दिल्याने पोलीस तेथे आले होते. पोलिसांनी त्याला वाळू पोत्यात भरताना पकडले व त्याच्याकडे २५ हजार रुपये लाच मागत होते. यातील २३ हजार रक्कम घेऊनही दोन हजारांसाठी वादावादी सुरू होती. त्यावेळी मी तेथे गेलो. त्यावेळी मी पोलिसांना सदर व्यक्तीचे पैसे परत करण्यास सांगत असल्याने माझ्यावर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. या सर्व बाबतचा आमच्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत.
या कारवाईबाबत प्रश्न व्यक्त करताना शंभूराजे जगताप म्हणाले की तालुक्यात अनेक ठिकाणावरून टिपरने वाळू काढली जाते तेव्हा पोलीस कुठे असता? वास्तविक महसूल खात्याने वाळू चोरी संदर्भात कारवाई करणे गरजेचे असताना तिथे फक्त पोलीसच कारवाई करण्यासाठी कसे आले ? सदर व्यक्ती हा मोटरसायकल वरून वाळू घेऊन जात होता परंतु गुन्हा नोंदवताना ट्रॅक्टर मध्ये वाळू नेत असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच अंबुजा सिमेंटच्या गोणी मध्ये दोन ब्रास वाळू कशी घेऊन जाता येईल असे प्रश्न श्री.जगताप यांनी केले. हे प्रकरण पोलिसांच्या जेव्हा अंगलट येण्याची चिन्ह दिसले त्यामुळेच त्यांनी आमच्यावर हे गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक कार्य करताना आम्ही असे कितीही गुन्हे आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत. याबरोबरच पोलिसांच्या विविध भ्रष्टाचाराचे, हफ्ते घेण्याचे व निष्क्रियतेची वेगवेगळी उदाहरणे त्यांनी देत पोलिसांवर आरोप केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी, गुन्हा आपापसात मिटवून घेण्यासाठी व अटक होऊ नये यासारख्या गोष्टींसाठी पैसे घेतले जात असून करमाळा पोलीस स्टेशनची महिन्याला यातून १ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा घणाघाती आरोप श्री जगताप यांनी केला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना फोनवरून आम्ही माहिती दिली असता शिल्पा ठोकडे यांनी स्वतः सांगितले आहे की अनेकवेळा पोलीस स्वतः जाऊन वाळू चोरणाऱ्याकडून पैसे घेऊन प्रकरण मिटवतात व त्यामुळे महसूल खात्याची बदनामी होत असते.

जयवंतराव जगताप यांनी आदिनाथ विषयी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये या विषयावर बोलताना श्री. जगताप म्हणाले की, करमाळा तालुका हा अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरलेला आहे. लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे खाल्ले जात आहेत. इथली जनता सोशिक आहे त्याचा फायदा अधिकारी घेत आहेत. त्यामुळे मला यामध्ये लक्ष घालण्याची गरज वाटत आहे.
शंभूराजे जगताप यांनी फक्त पोलिसांनी पैसे खाण्यास प्रतिबंध केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याआधी देखील बाळेवाडी येथील एका व्यक्तीने शौचालय बांधण्यासाठी नदीतून वाळू घेतली होती तर त्याच्याकडून देखील सव्वा लाख रुपये उकळले होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनांच्या दबावातून कुरेशी समाजावर गुन्हे दाखल केले जात आहेत. मी अशा भ्रष्टाचारी पोलिसांच्या विरोधात शासनाकडे दाद मागणार आहे. जर काही झाले नाही तर स्वतः आंदोलनात उतरणार असल्याचे श्री.जगताप यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, जगताप यांच्याकडून पोलिस प्रशासनाची बदनामी सुरू आहे. पैशाची मागणी कुठेही केलेली नाही. वरिष्ठांशी याबाबत मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणाबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी देखील प्रतिक्रिया देत शंभूराजे जगताप यांची पाठ राखण केली आहे. ते म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्यानंतर तो पदाधिकारी म्हणून आमच्याकडे येत असतो त्याच्यावर झालेल्या अन्यायाची बाजू घेऊन जर प्रशासनाला जाब विचारला तर जा विचारणाऱ्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक असून शहरातील व तालुक्यातील सर्व पक्ष गट तटाचे पदाधिकारी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना निवेदन देणार असून खोटी फिर्याद देणाऱ्या पोलिसांवर व तलाठ्यावर निलंबित करावी व दाखल झालेल्या गुन्हा रद्द करावा अशी मागणी करणार आहे. सध्या करमाळा तालुक्यातील सर्वच कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. दोन नंबर धंदे बोकाळले आहेत. दारू, मटका, जुगार, चक्री, भांग, गांजा, मटका, गुटका, ट्राफिक एन्ट्री या सर्व अवैध धंद्या सह नशेचे इंजेक्शन खुलेआम मिळत आहे. सिटी सर्वे ऑफिस पासून ते खरेदी विक्री कार्यालयापर्यंत दलालांची टोळी निर्माण झाली आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम असे कोणते खाते नाही की जिथे पैशाशिवाय काम होत नाही. करमाळ्यातील जनता मूग गिळून हे सहन करत आहेत. करमाळ्यात मोटारसायकल वर आलेला अधिकारी जाताना चार चाकी गाडीत जातो व करमाळ्यात आपला सातबारा उतारा निर्माण करतो हा आजपर्यंतचा अनेक अधिकाऱ्यांचा इतिहास आहे. विद्यमान लोक प्रतिनिधीचा प्रशासनावर वचक राहिला नाही.

