क्षेत्र बिटरगाव ते पंढरपूर माघवारीचे प्रस्थान २७ जानेवारीला होणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : संत रघुराज महाराजांच्या आशिर्वादाने वै. मुरलीधर महाराज यांच्या प्रेरणेने चालत आलेला माघवारी पायी दिंडी सोहळा ह.भ.प.गुरूवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली येत्या २७ जानेवारीला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्रस्थान सोहळा बिटरगाव (वांगी) येथून होत आहे. यावेळी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ह.भ.प. निखिल महाराज निंबाळकर यांनी केले आहे.
गेल्या शेकडो वर्षांची सांप्रदायिक परंपरा असणारी माघवारीची ही सर्वात मोठी दिंडी असून या दिंडीमध्ये केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हेतर उस्मानाबाद जिल्हा व कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दिंडीत ह.भ.प. बाळासाहेब काशिद, बालाजी बोराडे, विजय कोळी, मच्छिंद्र डुबल, लालासाहेब चोपडे, छगनमहाराज कदम, चंद्रकांत गोडसे, विष्णू महाराज दौंड, गणेश बर्गे, पंडित महाराज क्षीरसागर, कल्याण महाराज सरडे, कल्याण महाराज जाधवर आदी किर्तनकार सहभागी असतात.
यावर्षी या दिंडीचा २७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता प्रस्थान सोहळा होणार असून यावेळी तालुक्यातील मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दिंडीचा पहिला मुक्काम मंदिरात असून, दुसरा मुक्काम २८ जानेवारीला वांगी येथील जाधव वस्ती येथे राहणार आहे. २९ जानेवारीला कन्हेरगाव, ३० जानेवारीला करकंब, ३१ जानेवारीला पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार असून १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता नगरप्रदक्षिणा होणार आहे. यावेळी ह.भ.प.ॲड.जयंत महाराज बोधले पंढरपूर यांचे सायंकाळी सात ते नऊ किर्तन होणार आहे. २ फेब्रुवारीला गुरूवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादानंतर दिंडीचे कार्यक्रम संपतील.
दिंडीतील वारकऱ्यांसाठी योग्य त्या सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या असून जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडीत सहभागी व्हावे व संपर्क ७४९९८६३१९१ यावर करावा, असेही आवाहन ह.भ.प. निखिल महाराज निंबाळकर यांनी केले आहे.
