पोफळज येथे ४४ हजार रूपयांच्या सोन्याच्या अंगठ्या चोरट्यांनी पळविल्या..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोफळज (ता. करमाळा) येथे २६ नोव्हेंबरला पहाटे पावणेसहाच्या दरम्यान घरात कोणी नाही, हे पाहून घरात प्रवेश करून लाकडी कपाटातील दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत ४४ हजार रूपये) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत.
या प्रकरणी दयानंद भागवत कांबळे (रा. पोफळज रेल्वे स्टेशन शेजारी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी दररोज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास व्यायामाला जात असतो. २६ नोव्हेंबर रोजी मी सकाळी पाच वाजता व्यायामाला गेलो असता, माझ्या भावाचा मला फोन आला. तुझ्या खोलीचा दरवाजा उघडा दिसत आहे. चोरी झाल्याचे दिसून आले आहे.
त्यावेळी मी तातडीने घरी गेलो असता, मला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच लाकडी कपाटातील ४४ हजार रूपये किंमतीच्या दोन अंगठ्या दिसून आल्या नाहीत. अज्ञात चोरट्याने त्या चोरून नेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.