करमाळा तालुक्यातील दोन शिक्षकांना महात्मा फुले इतिहास अकादमीचा राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : काल (28 नोव्हेंबर) महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमामध्ये करमाळा तालुक्यातील
राहुल चव्हाण व धनंजय पन्हाळकर या दोन शिक्षकांना महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राहूल चव्हाण यांचे मुळ गाव कोर्टी,(ता.करमाळा) असून सध्या ते पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, खामगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. धनंजय पन्हाळकर यांचे मूळ गाव नेरले (ता.करमाळा) असून सध्या ते देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती न॑ .शा. पंतवालावलकर महाविद्यालयामध्ये गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
महात्मा फुले इतिहास अकादमी यांच्या वतीने पुणे येथील बालगंधर्व नाट्यमंदिर मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, चित्रलेखा या वृत्त पत्राचे संपादक ज्ञानेश महाराव इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे,जयेश काटकर,रविंद्र सावंत,डॉ. सुधाकर जाधवर,बळीराम बेडकर, पी ए इनामदार,दिगंबर दुर्गाडे श्रीकांत शिरोळे,प्रा.सोमनाथ गोडसे प्रा.औदुंबर लोंढे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
राहुल चव्हाण व धनंजय पन्हाळकर या दोन्ही शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमी महाराष्ट्र या संस्थेने त्यांना हा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हा पुरस्कार प्रदान झाल्यानंतर दोन्ही शिक्षकांचे करमाळा तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.