मुख्यमंत्रीसाहेब आदिनाथच्या ऊस दराच काय..? – ऊस उत्पादकांची मागणी..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.26 : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते पण या समारंभात आदिनाथच्या ऊसदराबाबत कोणीच बोलले नाहीत. ना पदाधिकारी, ना मंत्री, ना मुख्यमंत्री त्यामुळे सभासद-ऊस उत्पादक नाराज झाले असून, मुख्यमंत्रीसाहेब नेमकं ऊस दराच काय? हा प्रश्न विचारत आहेत.
आदिनाथ अनंत अडचणीनंतर सुरू होत आहे. ही सर्वांच्याच आनंदाची व फायद्याची बाब आहे. पण हा आदिनाथ कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून या कारखान्याने तालुक्यातील अन्य कारखान्याच्या तुलनेत किमान शंभर रूपये जरी जादा दर दिला तर या सर्व प्रयत्नांना महत्व रहाणार आहे. आदिनाथ हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे श्रध्दास्थान व आधारस्तंब आहे.
आदिनाथबाबत अनेक प्रश्न असताना सहकार तत्वावर हा कारखाना सुरू होत आहे ही बाब सर्वांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. त्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते शुभारंभ होत असल्याने आदिनाथचे आर्थिक प्रश्न सुटतील तसेच दराचा तिडा सुटेल याची खात्री सभासदांना होती. पण कालच्या कार्यक्रमात आदिनाथचे मुख्यप्रश्न सोडून अन्य बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
कामगारांच्या पगारी, कामगार पतसंस्थेचे देणे , वाहतूक ठेकेदारावर काढलेले कर्ज आदी बाबी बरोबरच ऊस उत्पादकांना कारखाना काय दर देणार ? यावर चर्चा झाली नाही तसेच तो विषय लावून धरला नाही. यामुळे ऊस उत्पादक आज आदिनाथच्या दराबाबत चर्चा करताना दिसत आहेत.याबाबत संबंधितांनी तात्काळ खुलासा करावा अशीही मागणी ऊसउत्पादक करत आहेत.