शिवसेनेच्या माढा विभाग जिल्हाप्रमुखपदी महेश चिवटे यांची निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी करमाळा येथील महेश चिवटे नियुक्ती करत असल्याचे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे, माढा करमाळा व माळशिरस या तीन तालुक्याची जबाबदारी महेश चिवटे यांच्यावर देण्यात आली आहे.
श्री. चिवटे शिवसेनेतील ठाकरे गटात उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते, पण पूर्वीपासूनच ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर श्री. चिवटे यांनी जाहीरपणे त्यांना पाठिंबा देवून करमाळा तालुक्यातील बहुतांशी शिवसेना शिंदे यांच्या पाठीशी उभा केली होती, एक आक्रमक चेहरा व प्रभावी वक्तृत्व संघटन कौशल्य या बाबींचा विचार करता या निवडीकडे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्याशी त्यांचा वाढलेला जनसंपर्क व सावंत यांच्या माध्यमातून आदिनाथ कारखान्याच्या प्रश्नसंदर्भात बजावलेली भूमिका सध्या चर्चेत आहे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना मदत करून दिली आहे, अनेक आरोग्य शिबिर घेऊन जनसंपर्क वाढवला आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून उठाव करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे नेते नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचे नेतृत्व मजबूत करणे गरजेचे असून त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
…नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे