भूम–परांडा आगारातील सर्व बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार - बागल यांच्या प्रयत्नांना यश -

भूम–परांडा आगारातील सर्व बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार – बागल यांच्या प्रयत्नांना यश

0

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गौंडरे फाट्यावर भूम–परांडा आगारातील सर्व एस.टी. बसेस आता नियमित थांबा घेणार आहेत. अशी माहिती गौंडरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर यांनी दिली.


यामुळे गौंडरे, निमगाव हवेली, कोळगाव, हिवरे व नेरले परिसरातील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी भूम व परांडा आगारातील बहुतेक बसेस या ठिकाणी थांबत नसल्याने प्रवाशांना करमाळा व परांडा येथे ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत होते.


या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बागल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक व संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर धाराशिव येथील विभाग नियंत्रक यांनी त्याबाबतचे लेखी आदेश दिल्याने या कामाला गती मिळाली आहे. या कामात श्री मकाई सह साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी देखील विशेष प्रयत्न केले असल्याचे बिचितकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे पूर्व भागातील प्रवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“आमची ही मागणी अनेक वर्षांपासून होती. मात्र कुणीच प्रयत्न केला नव्हता. आता सर्व बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार असल्याने आमचा वेळ वाचेल आणि गैरसोयही होणार नाही. याबद्दल आम्ही दिग्विजय बागल यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”
सुरज काळे, विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!