जिल्हापरिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरु- जगताप गटाचा उद्या मेळावा

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.४: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, तालुक्यातील राजकारणाला नवसंजीवनी देणारी मोठी घडामोड उद्या पाहावयास मिळणार आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते, अनुभवी मार्गदर्शक व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, ५ जानेवारी रोजी समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. करमाळा तालुक्यात जगताप गटाची संघटनात्मक ताकद लक्षवेधी मानली जाते. हीच ताकद अधिक भक्कम करण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात जयवंतराव जगताप थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून निवडणूकच्या तयारीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. युती की शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुक लढवली जाणार याचा उद्या निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

यशोदीप मंगल कार्यालयात( निलज रोड, करमाळा) उद्या( ता.५) दुपारी १ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून जगताप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने भव्य शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
“आगामी निवडणुकांत जगताप गटाची भूमिका काय असेल?”, “उमेदवारीबाबत कोणते संकेत मिळणार?” याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. “नेत्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यास आम्ही सज्ज आहोत,” अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.तरी या महत्त्वपूर्ण मेळाव्यास सर्व समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


