डॉ. भगवंत पवार यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – डॉ विठ्ठल लहाने

केम(संजय जाधव):वडशिवणे सारख्या छोट्या खेडेगावातून शिक्षण घेत डॉ. भगवंत पवार यांनी मिळवलेले दैदीप्यमान यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केले. वडशिवणे (तालुका करमाळा) येथे 1 फेब्रुवारी रोजी डॉ. भगवंत पवार यांना शालेय जीवनात घडविणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

एका शेतकरी कुटुंबातील मुलाने मिळवलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव सोनवणे होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, प्रा. संजय चौधरी, प्राचार्य ठोंबरे, उद्योजक सुनील कदम, प्रा. विशाल गरड, उद्योजक सोमनाथ खराडे, ढगे महाराज, परमेश्वर तळेकर, गोविंद जगदाळे, प्राचार्य पांचाळ, सुभाष पवार, भूषण लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भगवंत पवार यांना अंगणवाडीपासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या सर्व शिक्षकांचा विठ्ठलाची मूर्ती व भगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शिक्षकांचा झालेला सन्मान पाहून अनेक गुरुजन भावूक झाले.
यावेळी मनोज राऊत, डॉक्टर खरात, गोविंद जगदाळे, प्रा. विशाल गरड, संजीव सोनवणे, संजय चौधरी यांनी मनोगते व्यक्त केली. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. भगवंत पवार यांना ‘करमाळा भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विठ्ठल लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

डॉ. भगवंत पवार यांनी आपल्या मनोगतातून सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ देवकर व नागनाथ मोरे यांनी केले, तर आभार गणेश पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे छायाचित्रण परमेश्वर तळेकर, गोमाता मंदिर, केम यांनी केले.
डॉ. भगवंत पवार यांचे प्राथमिक शिक्षण वडशिवणे येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण अजितदादा पवार विद्यालय, वडशिवणे येथे मराठी माध्यमातून पूर्ण झाले. अकरावी व बारावीचे विज्ञान शिक्षण त्यांनी सोनवणे कॉलेज, उकडगाव येथून घेतले. नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 645 गुण मिळवून त्यांनी एम्स, हैदराबाद येथे एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. एमबीबीएस शिक्षणादरम्यान त्यांनी चार सुवर्णपदके पटकावून टॉपर म्हणून यश संपादन केले. त्यानंतर एमडी प्रवेश परीक्षेत देशात 668 वी रँक मिळवत हैदराबाद येथे एमडी शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. तसेच यूपीएससी सीएमएस परीक्षेत देशात 25 वी रँक मिळवून त्यांनी आणखी एक यशाचा टप्पा गाठला.

