विजया महामुनी व हेमंत महामुनी यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान -


विजया महामुनी व हेमंत महामुनी यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विजया अंबादास महामुनी व पंढरपूर (जि. सोलापूर) येथील विवेक वर्धिनी या संस्थेमधून शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या हेमंत अंबादास महामुनी यांना सोनार समाज संघटना, सोलापूर यांच्या वतीने ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा गौरव सोहळा २८ डिसेंबर २०२५ रोजी हुतात्मा नगरी, सोलापूर येथे पार पडला.

शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व नैतिक जडणघडणीत दिलेले महत्त्वपूर्ण योगदान, शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल या दोन शिक्षकांचा हा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार होते. मान्यवरांच्या हस्ते विजया महामुनी व हेमंत महामुनी  यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना दोन्ही पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी हा सन्मान सहकारी, विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमास विविध समाज संस्थांचे पदाधिकारी, समाजबांधव आणि आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पोतदार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!