केम येथे १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान भव्य कृषी प्रदर्शनचे आयोजन

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथे श्री उत्तरेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त १७ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शन २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन श्री उत्तरेश्वर देवस्थान मैदानात होणार असल्याची माहिती आयोजक नवनाथ खानट आणि गणेश तळेकर यांनी दिली.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित १५० हून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनात शेती अवजारे, पशुसंवर्धन व संगोपन, शेतमाल प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, हरित संकल्पना, ड्रोन तंत्रज्ञान आदी विषयांची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. या कृषी प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी प्रदर्शन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


