तरुण पिढीचा आधारस्तंभ : पांगरेचे पै. महेश शिवाजी टेकाळे यांनी बदलले तरुण शेतकऱ्यांचे नशीब


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३ :आजच्या बदलत्या काळात शेती म्हणजे केवळ कष्ट, अनिश्चितता आणि तोट्याचे गणित अशी भावना अनेक तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे. असे असलेतरी या सर्व अडचणीवर मात करत पांगरे (ता.करमाळा) गावचे तरुण, उद्योजक आणि उपसरपंच पै. महेश शिवाजी टेकाळे यांनी शेतीला जोडधंद्याची जोड देत एक प्रेरणादायी उद्योग उभा केला आहे. त्यांनी केवळ स्वतःचा विकास साधला नाही, तर आपल्या नेतृत्वातून परिसरातील १४ तरुण शेतकऱ्यांचे आर्थिक नशीब बदलून टाकले आहे.

जेऊर परिसर हा पारंपरिकपणे ऊस व केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत मजुरांची कमतरता, वाढता खर्च, वेळेवर ऊसतोड न होणे आणि वाहतुकीअभावी होणारे नुकसान यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. दुसरीकडे, उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात असताना शेतीकडे वळले, पण उत्पन्नाच्या अनिश्चिततेमुळे तेही हतबल झाले.ही परिस्थिती ओळखून पै. महेश टेकाळे यांनी “शेतीवरच अवलंबून न राहता शेतीशी निगडित जोडधंदे उभा करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी परिसरातील १४ तरुण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ऊस वाहतूक व्यवसायाचा आराखडा तयार केला. त्यांनी तरुणांना १० नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या २ ट्रॅक्टरसह एकूण १५ ट्रॅक्टरचा मजबूत ताफा उभा राहिला.या ताफ्याच्या माध्यमातून ४ नामांकित साखर कारखान्यांशी थेट करार करण्यात आला. आजच्या काळात सर्वात मोठी अडचण मानली जाणारी मजुरांची व्यवस्था देखील त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वीपणे हाताळली. तब्बल ३५० मजुरांचे नियोजन करून ऊसतोड आणि वाहतूक वेळेत पूर्ण करण्यात आली. या एकत्रित आणि नियोजनबद्ध प्रयत्नांचा परिणाम म्हणजे चालू गळीत हंगामात जेऊर परिसरातून तब्बल ४१,००० टन उसाची विक्रमी वाहतूक या १५ ट्रॅक्टर मालकांनी यशस्वीपणे केली. वेळेवर ऊस कारखान्यापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले, तसेच कारखान्यांनाही सातत्यपूर्ण पुरवठा मिळाला.


या ऊस वाहतूक व्यवसायातून या टीमने अंदाजे ४/४.५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. या उत्पन्नातून डिझेल खर्च, मजुरांचे वेतन, ट्रॅक्टरची देखभाल-दुरुस्ती, सुटे भाग खरेदी अशा माध्यमातून ग्रामीण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार वाढले आहेत. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, शेतीला जोडधंद्याची आणि आधुनिक व्यवस्थापनाची जोड दिली पाहिजे. आपल्या भागातील तरुणांनी एकत्र येऊन काम केले, तर आपण नोकरी मागणारे न राहता रोजगार देणारे बनू शकतो—हेच आम्हाला सिद्ध करायचे होते,”
पै. महेश शिवाजी टेकाळे ,पांगरे

स्वतःच्या कुटुंबापुरते न राहता गावातील व परिसरातील इतर शेतकरी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उचललेले हे पाऊल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.ही कथा केवळ यशाची नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवी दिशा दाखवणारी प्रेरणादायी वाटचाल आहे. पांगरे–जेऊर परिसरातील तरुणांमध्ये या उपक्रमामुळे नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच पै. महेश टेकाळे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
