हिवरे येथील प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३:
हिवरे गावचे सुपुत्र प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ यांच्या ‘भारतीय संविधान आणि लोकशाही अमृतमहोत्सवी वाटचाल : एक दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद भवन येथे नुकताच उत्साहात पार पडला.
या पुस्तकाचे प्रकाशन राजकीय विश्लेषक केशव वाघमारे, लेखक श्रीरंजन आवटे, प्रा. नितीन तळपाडे, सागर काकडे, ह्रदयमानव अशोक, पैगंबर शेख आणि मतीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते व संविधान अभ्यासक प्रा. अॅड. संभाजी मोहीते होते.

यावेळी बोलताना केशव वाघमारे यांनी सांगितले की, “भारतीय संविधान आणि लोकशाहीबाबत एकीकडे भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात लेखन-वक्तृत्व होत असताना दुसरीकडे संविधानिक व लोकशाही मूल्यांपासून फारकत घेतली जात आहे. अशा काळात संविधानिक आणि लोकशाही मूल्यांवर सखोल आंतरदृष्टी देणारे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे.”
लेखक श्रीरंजन आवटे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “डॉ. ओहोळ यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला वेध चिंतनशील आहे. त्यांनी भूतकाळाचा आढावा घेत वर्तमानातील आव्हानांचा परामर्श घेतला असून या वैचारिक संश्लेषणातून भविष्याच्या दिशा अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल.”
या पुस्तकाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि सकाळ चे संपादक श्रीराम पवार यांची प्रस्तावना लाभली आहे.



पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे
पृष्ठसंख्या: ४४४,
भाग: दोन,प्रकरणे: १७
प्रकाशक: प्रियदर्शन प्रकाशन
उपयुक्तता: वाचकप्रेमी, अभ्यासक, स्पर्धा परीक्षार्थी
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेले हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
