श्री ऊत्तरेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य; कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी

0

केम|संजय जाधव : केम (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून मंदिराजवळील पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी केम येथील सागर तळेकर यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मंदिराजवळील पुलाखाली प्लास्टिक, पुठ्ठे, कापड तसेच इतर विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे. विशेषतः काही नागरिकांकडून व महिलांकडून येथे कचरा टाकला जात असल्याने परिसराची स्वच्छता धोक्यात आली आहे. पावसाळ्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी अधिक वाढली असून परिसर अस्वच्छ झाला आहे.



श्री ऊत्तरेश्वर देवस्थान हे केमचे जागृत ग्रामदैवत असून येथे भाविकांची नियमित वर्दळ असते. मंदिर परिसरालगत माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज तसेच रेल्वे स्थानक असल्यामुळे या मार्गावरून विद्यार्थी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे या अस्वच्छतेचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मंदिरासमोरील मैदानावर दर आठवड्याला बाजार भरत असून मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानांवर कचऱ्यामुळे निर्माण होणारे डास, माशा बसत आहेत. त्यामुळे अन्नपदार्थ दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.



साचलेल्या कचऱ्यामुळे माशा व डासांची उत्पत्ती वाढत असून डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!