खडकी–जातेगाव रस्त्याची दुरवस्था-तातडीने डांबरीकरणाची ग्रामस्थांची मागणी

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : खडकी ते जातेगाव हा सुमारे पाच किलोमीटर लांबीचा रस्ता अत्यंत खराब झाला असून नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खडी उखडल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी खडकी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकी वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून चारचाकी वाहने चालविणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सरपंच उमेश बरडे , सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक शिंदे, केशव शिंदे, गणेश गोसावी, भाऊ शिंदे, सुरज बरडे, शुभम बरडे, वैभव शिंदे, दत्ता सुरवसे, विजय शिंदे, सचिन सावंत वैगरे प्रयत्नशील आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंता श्री. खटावकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी या रस्त्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात सादर करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.खडकी–जातेगाव मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


