बाळेवाडीत घरफोडी – तब्बल १.७८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा : बाळेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ७८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात उत्तरेश्वर नलवडे (वय ७०, रा. बाळेवाडी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले की मी दिनांक १५ जून रोजी दुपारी वीजबिल भरण्यासाठी करमाळा येथे गेले असताना माझ्या पुतण्याने फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. घरी परतल्यानंतर पाहणी केली असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच पाठीमागील दरवाज्याचा आतील कडी-कोयंडा तुटलेला आढळला. कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची बोरमाळ, गंठण, पिळ्याची अंगठी, नथ व सोन्याचे मणी यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत १ लाख ७८ हजार ५०० रुपये इतकी आहे.या प्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.


