रावगाव परिसरातील वीज प्रश्नावर आमदार नारायण पाटील आक्रमक; जिल्हा नियोजन समितीत मुद्दा केला उपस्थित

0

करमाळा : सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील, विशेषतः रावगाव परिसरातील वीजपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नांवर ठाम भूमिका घेत आवाज उठवला.

बैठकीदरम्यान आमदार पाटील यांनी रावगाव येथील प्रस्तावित ३३/११ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राच्या रखडलेल्या कामकाजाकडे लक्ष वेधले. तसेच सध्या या परिसरात शेतीसाठी दिला जाणारा अपुरा व खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत माहिती देताना आमदार पाटील म्हणाले की, रावगाव व परिसरातील शेतीपंपांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून २०१६ मध्ये आमदार असताना ३३/११ केव्ही क्षमतेच्या नवीन उपकेंद्रास मंजुरी मिळवून देण्यात आली होती. या उपकेंद्राची उभारणी लवकर सुरू व्हावी यासाठी वेळोवेळी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मात्र, जागेच्या व अन्य तांत्रिक अडचणींमुळे तसेच सत्तांतरानंतर गेल्या पाच वर्षांत हा प्रश्न प्रलंबित राहिला.

२०२४ मध्ये पुन्हा आमदारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महावितरणची आढावा बैठक घेऊन रावगाव उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. रावगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे उपकेंद्र लवकरच उभारण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रावगाव व करमाळा तालुक्यातील काही भागांत शेतीपंपांसाठी सध्या रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्याबाबत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यभरात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे निर्देश असतानाही या भागात रात्री व कमी दाबाने वीज दिली जात असल्याने वारंवार खंडित पुरवठ्याचे प्रकार घडत आहेत. याचा थेट परिणाम रब्बी पिकांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने आणि अखंडित वीजपुरवठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!