ऊत्तरेश्वर यात्रेनिमित्त केममध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; कुस्ती, बैलगाडा शर्यत, कृषी प्रदर्शनाचेही आयोजन

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान यांची वार्षिक यात्रा दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

यात्रेच्या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत शिवलीलामृत ग्रंथ पारायण, दुपारी १२ ते ९ या वेळेत श्रींना नैवेद्य तसेच ब्राह्मण व मानकरी भोजन होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त रात्री १२ नंतर शिवलिंगास निशीथकाली लघुरुद्राभिषेक होईल. सायंकाळी ९ ते ११ या वेळेत कीर्तन व जागर आयोजित करण्यात आला असून यामध्ये ह.भ.प. सुरेश थिटे महाराज (केम), ह.भ.प. अजिंक्य महाराज चाकणकर आणि ह.भ.प. मिलिंद महाराज गुंडेकर सहभागी होणार आहेत.

बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी १२ वाजून ५ मिनिटांनी श्रींचा भव्य छबीना निघणार असून छबिन्यासमोर नयनरम्य शोभेचे दारूकाम व रात्रभर मिरवणूक होणार आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी गणपती मंदिराजवळ, केम–करमाळा रोडलगत असलेल्या ऊत्तरेश्वर केसरी बैलगाडा शर्यत स्थळी सायंकाळी ९ ते ११ या वेळेत जुगलबंदी भारूड सादर करण्यात येणार असून यात विनायक गुरव आणि नंदू गोडसे सहभागी होणार आहेत.
शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ नंतर जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभणार आहे.
यावर्षी प्रथमच दि. १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सुमारे १५० स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याची संधी मिळणार आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर केम ग्रामपंचायत यांच्या वतीने यात्रा मैदानावर पाणी मारणे, फिरती शौचालये तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सारिका कोरे यांनी दिली. तसेच यात्रेसाठी करमाळा आगार कडून केम–टेंभुर्णी विशेष एसटी फेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. यात्रा शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

