“मोठी स्वप्ने पाहा आणि साकार करा ” – डॉ. ॲड. बाबूराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. १९ : “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. कारण स्वप्नांमधूनच भविष्याचा आकार घडत असतो,” असे प्रेरणादायी आवाहन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी केले.
गौंडरे येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हिरडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महर्षी गुरुवर्य रागे-शिंदे महाविद्यालय चे प्रा. शंकर अंकुश हे होते.
संस्थेचे अध्यक्ष उमराव रणमोडे, सचिव दादासाहेब सांगडे, मुख्याध्यापक गौतम सांगडे, सरपंच सुभाष नाना हानपुडे, पोलीस पाटील श्रीमती अंबारे तसेच संगीत विशारद विजय खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या भाषणात डॉ. हिरडे पुढे म्हणाले, “हे वय खेळण्याचे, आनंद घेण्याचे आहेच; पण त्याचबरोबर जीवनाचे ध्येय ठरवण्याचेही आहे. आपण कोण होणार आहोत याचे नियोजन शालेय जीवनातच केले, तर पुढील वाटचाल सुलभ होते.”
विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे जावे, सातत्याने प्रयत्न करावे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे अवाहन केले.यावेळी प्रा. शंकर अंकुश यांनीही अध्यक्षस्थानावरून बोलताना, परीक्षा कशी द्यावी, भविष्य कसे समजून घ्यावे व प्रगती कशी करावे असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक गोपणे यांनी केले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.
हा निरोप समारंभ प्रेरणादायी वातावरणात आणि भावनिक क्षणांच्या साक्षीने संपन्न झाला.
