परीक्षेच्या कालावधीत वीज वितरणने कनेक्शन तोडू नये-रामकृष्ण नायकोडे

0


करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२१:दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीने थकबाकी बिलाच्या कारणास्तव वीज कनेक्शन तोडू नयेत तसेच अनावश्यक वीज कपात करू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नायकोडे यांनी केली आहे.
सध्या राज्यभरात काॅलरशीप, दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत काही भागात थकबाकी बिलाच्या कारणास्तव वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच नियोजित वीज कपातीमुळेही विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करणे कठीण जात आहे. ग्रामीण भागात तर पर्यायी साधनांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.


या पार्श्वभूमीवर श्री.नायकोडे यांनी आमदार नारायण आबा पाटील यांना भेट घेऊन विनंती केली आहे. परीक्षेचा कालावधी संपेपर्यंत, किमान चालू महिन्याच्या अखेरपर्यंत, कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित करू नये व थकबाकी वसुलीसाठी कारवाई पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत आमदार पाटील यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. दरम्यान परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळावा, अशी अपेक्षा पालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!