मकाई सहकारी साखर कारखान्यातून चार लाखांचा माल चोरी

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२१: भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्यातून सुमारे चार लाख रुपयांचा मशिनरी साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जनरल मॅनेजर हरीशचंद्र प्रकाश खाटमोडे (वय ४६) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल दिली आहे.
सदर फिर्यादीत म्हटले आहे की..कारखाना फेब्रुवारी २०२३ पासून बंद अवस्थेत आहे. कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ११ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून ते तीन शिफ्टमध्ये काम करतात. दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बगॅस शेडजवळील कॅमेरा बंद पडल्याचे निदर्शनास आले. ड्युटीवरील सुरक्षा रक्षक महादेव विलास अनपट यांनी पाहणी केली असता काही साहित्य जागेवर दिसून आले नाही.

त्यानंतर जनरल मॅनेजर यांनी स्वतः पाहणी केली असता मशिनरीमधील महत्त्वाचे साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये इलेक्ट्रिक मोटारींचे लहान-मोठे २० बेअरिंग (अंदाजे किंमत ९५,००० रुपये), ५७ किलो वजनाचे ब्रास मटेरियल (९०,००० रुपये), २४० मीटर कॉपर वायर (१,५०,००० रुपये) तसेच ४० किलो वजनाचे जी.एम. बुश (६५,००० रुपये) असा एकूण ४,००,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. बंद अवस्थेतील कारखान्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



