भाळवणी शिवारात ३२ हजारांची केबल चोरी

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१: भाळवणी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील वीज केबल चोरी केल्याची घटना  घडली  आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंभोरे येथील शेतकरी बबन लक्ष्मण मोरे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची ३.५ एकर शेती मौजे भाळवणी, ता. करमाळा येथील गट क्रमांक ५७/४ मध्ये आहे. संबंधित शेतात दोन बोअरवेल व एक शेततळे असून, बोअरचे पाणी शेततळ्यात टाकण्यासाठी सुमारे ७०० ते ८०० फुट लांबीची काळ्या रंगाची केबल जमिनीवर अंथरलेली होती. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता लाईट गेल्यानंतर मोटार बंद करण्यात आली होती. त्यानंतर दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता मोरे हे शेतात गेले असता अंथरलेली केबल जागेवर दिसून आली नाही. त्यांनी वडील तसेच शेजारील शेतकरी सुरज अशोक धेंडे व संतोष ज्ञानदेव मोरे (रा. निंभोरे) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनाही केबल चोरीबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी सुरज धेंडे यांनीही त्यांच्या गट क्रमांक ५८ मधील सुमारे १०० फुट केबल चोरीस गेल्याचे सांगितले.

दोन्ही शेतांमध्ये शोध घेऊनही केबल मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी सुमारे ३२ हजार रुपये किंमतीची केबल चोरून नेल्याची खात्री झाल्याचे मोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, करमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!