नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

करमाळा : करमाळा येथील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विवेक ननवरे, शितल करे पाटील उपस्थित होते. याचबरोबर संस्थेचे विश्वस्त महादेव फंड घोलप तसेच संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी उपस्थित होते.
पर्यवेक्षक म्हणून श्री काजी, श्री बलदोटा, श्रीमती अग्रवाल, श्रीमती बंडगर, श्रीमती अभंग, श्रीमती शितल लोंढे, श्री भागडे, श्री भोसले, श्री मोईन काझी व श्रीमती भिंगारे यांनी कामकाज पाहिले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नवीन कल्पना व संशोधनाला प्रोत्साहन देणे, प्रयोगाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे तसेच आत्मविश्वास व सादरीकरण कौशल्य वाढवणे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. या प्रदर्शनात नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात विज्ञान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. सुनीता देवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विज्ञान विषयातील जिज्ञासा व प्रयोगशील वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.

विज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल गणेश करे पाटील यांचा शाळेतर्फे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले तसेच शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर केला. प्रदर्शनातील 35 विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघाली शेटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनुराधा सुरवसे यांनी केले. कार्यक्रमास श्री अग्रवाल, श्री साने, श्रीमती बलदोटा तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

