वाशिंबे येथे महिला दिनानिमित्त रंगला ‘होम मिनिस्टर’ चा कार्यक्रम

करमाळा :जागतिक महिला दिनानिमित्त वाशिंबे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या वतीने विविध स्पर्धांच्या माध्यमातून कार्यक्रम रंगतदार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण जंगम तसेच सातारा–कोरेगावचे नगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘पैठणीचा खेळ’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आनंद लुटला. स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावत दिवेगव्हाण येथील अमृता उमेश खटमोडे यांनी ‘होम मिनिस्टर’चा किताब जिंकत फ्रिज हे बक्षीस मिळवले.
द्वितीय क्रमांक अंजली अतुल रणदिवे यांना पिठाची चक्की देण्यात आली. तसेच योगिता पंकज पवार यांना कुलर, तर भक्ती कळसाईत आणि सुप्रिया शिंदे यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असल्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना आनंददायी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात प्रसिद्ध अँकर क्रांती नाना माळेगावकर यांनी विविध स्पर्धा घेऊन वातावरण अधिक रंगतदार केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला.

