ईद खरेदीत जात-धर्म नव्हे तर सद्भावना व विश्वास महत्त्वाचे : हाजी कलीम काझी

करमाळा :रमजान ईद जवळ आल्याने सध्या सर्वत्र खरेदी-विक्रीची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही अफवा व दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून सर्वांनी शांतता, संयम आणि सामाजिक सद्भावना जपावी, असे आवाहन करमाळा मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सकल मुस्लिम समाज करमाळा आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, ईदची खरेदी करताना दुकानदाराची जात किंवा धर्म पाहू नये. योग्य किंमतीत आणि चांगल्या दर्जाचा माल मिळत असेल, तर तो दुकानदार कोणत्याही समाजाचा असो, निःसंकोचपणे त्या दुकानातून खरेदी करावी.

करमाळा तसेच सोलापूर आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांची होलसेल मार्केट असून विविध समाजातील व्यापारी प्रामाणिकपणे व्यापार करत आहेत. यामध्ये हिंदू, सिंधी, गुजराती, मारवाडी, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध तसेच इतर समाजातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या भडकावू किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले.
ईद हा आनंद, बंधुता आणि एकतेचा सण असून खरेदी करताना जात-धर्म न पाहता सद्भावना, विश्वास आणि सामाजिक ऐक्य जपणे हीच खरी ईदची भावना असल्याचे हाजी कलीम काझी यांनी सांगितले. रमजान ईदच्या निमित्ताने करमाळा शहरात शांतता, बंधुता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी समीर शेख, जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण, सुरज शेख, रमजान बेग, जहांगीर बेग, इकबाल शेख, इम्तियाज पठाण, आझाद शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, जावेद सय्यद, शाहीद बेग, अलिम पठाण, अरबाज बेग, कलीम शेख, दिशान कबीर, खलील कुरेशी, सुपरान शेख, शाहरुख शेख, गुलाम सय्यद, कय्युम मदारी, अक्रम मदारी व दाऊद मदारी आदी उपस्थित होते.

